ABP News Opinion Poll Survey : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये या वर्षाअखेर विधानसभा निवडणूक होत आहे. या तीनही राज्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीअगोदर एबीपी न्यूज आणि सी व्होटरने सर्वात मोठा ओपिनियन पोल केला आहे.


मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीनही राज्यांमध्ये भाजप पिछाडीवर आहे, तर काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे काँग्रेस या निवडणुकीतून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मध्य प्रदेश ओपिनियन पोल


एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, मध्य प्रदेश भाजपच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. इथे भाजपला 40 टक्के, काँग्रेस 42 टक्के आणि इतरांना 18 टक्के मतं मिळताना दिसत आहेत.

एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. एकूण 230 जागांपैकी काँग्रेसला 117, भाजप 106 आणि इतर पक्षांना सात जागा मिळत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी मोदींना पसंती

राज्यातलं चित्र भाजपविरोधी असलं तरी केंद्रात मात्र जनतेला मोदी सरकारच हवं आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, लोकसभेत भाजपला मध्य प्रदेशात 46 टक्के, काँग्रेसला 39 टक्के आणि इतरांना 15 टक्के मिळत आहेत.

2019 ला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना 54 टक्के, तर राहुल गांधी यांना 25 टक्के जनतेने पसंती दिली आहे.

मध्य प्रदेशातील सद्यपरिस्थिती?

मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 आणि लोकसभेच्या 29 जागा आहेत. 2013 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 165 आणि काँग्रेसने 58 जागा मिळवल्या होत्या. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 29 पैकी 27 जागांवर विजय मिळाला. शिवराज सिंह चौहान 29 नोव्हेंबर 2005 साली मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. त्यांच्यापूर्वी बाबूलाल गौर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

छत्तीसगड ओपिनियन पोल


एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, गेल्या 15 वर्षांपासून ताब्यात असलेलं छत्तीसगड भाजपच्या हातून जाण्याची शक्यता आहे. या सर्व्हेनुसार, भाजपला 39 टक्के, काँग्रेसला 40 टक्के आणि इतरांना 21 टक्के मतं मिळत आहेत.

एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, 90 जागा असणाऱ्या छत्तीसगड विधानसभेत काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचं चित्र आहे. भाजपला 33, काँग्रेसला 54 आणि इतरांना तीन जागा मिळताना दिसत आहेत.

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रमन सिंह यांना 34 टक्के, अजित जोगी 17 टक्के आणि भूपेश बघेल यांना नऊ टक्के जनतेने पसंती दिली आहे.

लोकसभेसाठी मोदीच!

विधानसभेत राज्य भाजपच्या हातून दिसत असलं तरी केंद्रात जनतेने मोदींनाच कौल दिला आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, भाजपला लोकसभेसाठी 46 टक्के, काँग्रेसला 36 टक्के आणि इतरांना 18 टक्के मतं मिळताना दिसत आहेत.

एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींनाच पहिली पसंती आहे. नरेंद्र मोदींना छत्तीसगडमधील 56 टक्के जनतेने पसंती दिली आहे. तर 21 टक्के जनता राहुल गांधींच्या बाजूने आहे.

छत्तीसगडमधील चित्र काय?

छत्तीसगड विधानसभेत 90 आणि लोकसभेच्या 11 जागा आहेत. 2013 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 49 आणि काँग्रेसने 39 जागांवर विजय मिळवला होता. तर 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत 10 जागा भाजपला आणि काँग्रेसला एक जागा मिळाली होती. डॉ. रमन सिंह 7 डिसेंबर 2003 रोजी मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले.

राजस्थान ओपिनियन पोल


राजस्थान विधानसभा : कुठल्या पक्षाला किती जागा?

काँग्रेस – 130

भाजप – 57

इतर – 13

राजस्थान विधानसभा : कुणाला किती टक्के मतं?

काँग्रेस – 57 टक्के

भाजप – 37 टक्के

इतर – 12 टक्के

राजस्थान विधानसभा : मुख्यमंत्रीपदासाठी कुणाला किती पसंती?

अशोक गहलोत – 41 टक्के

सचिन पायलट – 18 टक्के

एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार, राजस्थानात सत्तांतर होणार आहे. राजस्थानमध्ये सध्या भाजपचं सरकार आहे. मात्र या ओपिनियन पोलनुसार आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार असल्याचे दिसत आहे.

राजस्थानात लोकसभेला कुणाला किती टक्के मतं?

भाजप – 47 टक्के

काँग्रेस – 43 टक्के

इतर – 10 टक्के

पंतप्रधान पदासाठी कुणाला पसंती?

नरेंद्र मोदी – 55 टक्के

राहुल गांधी – 22 टक्के

लोकसभेसाठी राजस्थानात मात्र भाजपला पसंती असल्याचे सर्वेक्षणातून दिसते आहे. पंतप्रधानपदासाठी मात्र नरेंद्र मोदी यांनाच पसंती दिली जातेय.

राजस्थानमधील राजकीय स्थिती

राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 आणि लोकसभेच्या 25 जागा आहेत. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 120 आणि काँग्रेसला 56 जागा मिळाल्या होत्या. 2014 साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्व 25 जागांवर विजय मिळवला होता.

सर्व्हे कसा झाला?

या सर्वेक्षणाअंतर्गत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील 27 हजार 968 लोकांशी बातचित केली गेली. तीन राज्यांच्या सर्व 65 लोकसभा जागांवर एक जून ते 10 ऑगस्ट या दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले.