नवी दिल्ली : केंद्र सरकारने आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलंय. आता येत्या 31 मार्चपर्यंत पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड बंद पडू शकते. एवढंच नाही तर आयकर कायद्याच्या नियमानुसार, या काळात जर आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक न केल्यास तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 


या आधीही सरकारन पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी अनेकदा डेडलाईन वाढवली होती. मंगळवारी लोकसभेत या संबंधी अर्थ विधेयक, 2021 पारित करण्यात आलं आहे. त्यानुसार आता नागरिकांनी आपल्या पॅन कार्डला आधार लिंक केलं नाही तर एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. 


इतर सुविधांच्या लाभापासून वंचित
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड  (CBDT) ने स्पष्ट केलंय की नागरिकांना त्यांना दिलेल्या वेळेच्या आत त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक करावं. असं केलं नाही तर संबंधित पॅन कार्ड बंद होईल. त्यामुळे अनेक आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. तसेच बँक खाते उघडणे, बँकांचे व्यवहार, सरकारी पेन्शन, एलपीजी सब्सिडी, स्कॉलरशीप अशी अनेक सुविधांपासून वंचित रहावं लागेल. 


ऑनलाइन पद्धतीने लिंक करता येईल
जर तुम्ही पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणार असाल तर ते आता ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकेल.  त्यासाठी www.incometaxindiaefiling.gov.in या सरकारच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यामध्ये पॅनला आधार लिंक करण्याचा  पर्याय आहे. तो क्लिक केल्यानंतर एक फॉर्म समोर येईल. त्यावर तुमचा पॅन क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक टाकावा. तसेच इतर व्यक्तिगत माहिती भरावी लागेल. त्यावेळी तुम्हाला एक ओटीटी क्रमांक येईल. तो ओटीटी क्रमांक भरल्यानंतर लिंक आधार असा पर्याय समोर दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक होईल. 


संबंधित बातम्या :