अहमदाबाद : गोध्रा हत्याकांडातील 11 आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली असून या शिक्षेचं रुपांतर जन्मठेपेत करण्यात आलं आहे. गुजरात हायकोर्टाने हा निर्णय दिला. शिवाय या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

गोध्रा हत्याकांडात 31 जणांना शिक्षा सुनावण्यात आली होती. 11 आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यांची शिक्षा आता जन्मठेपेत बदलली आहे. शिवाय 20 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आता सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या आरोपींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली


  1. बिलाल इस्माइल उर्फ हाजी बिलाल

  2. अब्दुल रझाक कुरकरु

  3. रामझानी बिनयामीन बेहरा

  4. हसन अहमद चरखा

  5. जाबीर बिनयामीन बहेरा

  6. महेबूब चंदा

  7. सलीम युसूफ जर्दा

  8. सिराझ मोहम्मद मेडा

  9. इरफान कलंदर

  10. इरफान पातलिया

  11. महेबूब हसन लतिको


या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

  1. सुलेमान अहमद हुसैन

  2. अब्दुल रहेमान धंतीया

  3. कासीम अब्दुल सत्तार बिरयानी

  4. शौकत मौलवी इस्माइल बदाम

  5. अनवर मोहम्मद मेहडा उर्फ लालू

  6. सिद्दिक माटुंगा

  7. महेबूब याकुब मीठा उर्फ पोपा

  8. सोहेब युसूफ अहमद कलंदर

  9. अब्दुल सत्तार पातलिया

  10. सिद्दिक महोम्मद मोरा

  11. अब्दुल सत्तार इब्राहिम असला

  12. अब्दुल रऊफ

  13. युनुस अब्दुल हक उर्फ घडियाली

  14. इब्राहिम अब्दुल रझाक

  15. बिलाल अब्दुला बदाम

  16. हाजी भूरीया उर्फ फारुक

  17. अयुब अब्दुल गनी इस्माइल पातलिया

  18. इरफान सिराज घांची

  19. मोहम्मद हनीफ मौलवी इस्माइल बदाम

  20. शौकत युसूफ मोहन


गोधरा हत्याकांड प्रकरण काय आहे?

गुजरातमधील गोधरा स्टेशनवर 27 फेब्रुवारी 2002 रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 या बोगीला आग लावण्यात आली होती. अयोध्येहून परतणाऱ्या 59 कारसेवकांचा यामध्ये मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगली उसळल्या.

साबरमती ट्रेनच्या एस-6 या बोगीला आग लावल्याप्रकरणी एसआयटीच्या विशेष न्यायालयाने 31 जणांना दोषी ठरवलं होतं, तर 63 जणांना निर्दोष मुक्त केलं. आरोपींपैकी 11 जणांना फाशी, तर 22 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

कोर्टाच्या या निर्णयाला गुजरात हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. आरोपींना दिलेली शिक्षा कमी आहे, निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी गुजरात सरकारने केली होती. तर आपल्याला अजून न्याय मिळाला नसल्याचं आरोपींनी म्हटलं होतं.

या घटनेच्या चौकशीसाठी गुजरात सरकारने नानावटी आयोगाची स्थापना केली. साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 बोगीत लागलेली आग ही एक घटना नव्हती, तर तो एक कट होता, असं या आयोगाने म्हटलं होतं.