गोधरा हत्याकांड : 11 जणांची फाशी, 20 जणांची जन्मठेप कायम राहणार?
एबीपी माझा वेब टीम | 09 Oct 2017 08:54 AM (IST)
गुजरात हायकोर्ट आज गोधरा हत्याकांड प्रकरणी निर्णय देणार आहे. या घटनेत 59 जणांचा मृत्यू झाला होता.

अहमदाबाद : गोधरा हत्याकांड प्रकरणी गुजरात हायकोर्ट आज निर्णय देणार आहे. सकाळी 11 वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे. गुजरातमधील गोधरा स्टेशनवर साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 या बोगीला आग लावण्यात आली होती. अयोध्येहून परतणाऱ्या 59 कारसेवकांचा यामध्ये मृत्यू झाला होता. साबरमती ट्रेनच्या एस-6 या बोगीला आग लावल्याप्रकरणी एसआयटीच्या विशेष न्यायालयाने 31 जणांना दोषी ठरवलं होतं, तर 63 जणांना निर्दोष मुक्त केलं. आरोपींपैकी 11 जणांना फाशी, तर 22 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. कोर्टाच्या या निर्णयाला गुजरात हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. आरोपींना दिलेली शिक्षा कमी आहे, निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी गुजरात सरकारने केली होती. तर आपल्याला अजून न्याय मिळाला नसल्याचं आरोपींनी म्हटलं होतं. गोधरा हत्याकांड प्रकरण काय आहे? गुजरातमधील गोधरा स्टेशनवर 27 फेब्रुवारी 2002 रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 या बोगीला आग लावण्यात आली होती. अयोध्येहून परतणाऱ्या 59 कारसेवकांचा यामध्ये मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगली उसळल्या. या घटनेच्या चौकशीसाठी गुजरात सरकारने नानावटी आयोगाची स्थापना केली. साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 बोगीत लागलेली आग ही एक घटना नव्हती, तर तो एक कट होता, असं या आयोगाने म्हटलं होतं.