LCH In Airforce : उद्याचा 3 ऑक्टोबर म्हणजेच सोमवार हा दिवस देशासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. खास करून हवाई-शक्ती आणि संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने खूप महत्त्वाचा दिवस आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत सोमवारी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LACH) औपचारिकपणे हवाई दलात सामील होणार आहे. विशेष बाब म्हणजे भारतीय हवाई दलाचे पहिले स्वदेशी अटॅक हेलिकॉप्टर जोधपूरमध्ये एलसीएच सीमेजवळ तैनात केले जाईल आणि सोमवारी लष्करी समारंभात संरक्षण मंत्री स्वत: एलसीएच हवाई दलाला सुपूर्द करतील.


पंचप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने (CCS) या वर्षी मार्चमध्ये 15 स्वदेशी लाइट अटॅक हेलिकॉप्टर (LCH) खरेदीला मंजुरी दिली होती. एचएएलकडून ही हेलिकॉप्टर 3387 कोटींना खरेदी करण्यात आली आहेत. यापैकी 10 हेलिकॉप्टर हवाई दलासाठी आणि 05 भारतीय लष्करासाठी  आहेत.


भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, HAL ने LCH एव्हिएशन कॉर्प्सला दोन हलकी लढाऊ हेलिकॉप्टर सुपूर्द केली आहेत. LCH हे देशातील पहिले अटॅक हेलिकॉप्टर आहे जे सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने तयार केले आहे.


LCH चे फायदे ?


लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर म्हणजेच एलसीएच हेलिकॉप्टरचे वजन सुमारे 6 टन आहे. त्यामुळे ते खूपच हलके आहे, तर अमेरिकेतून घेतलेल्या अपाचे हेलिकॉप्टरचे वजन सुमारे 10 टन आहे. कमी वजनामुळे एलसीएच आपल्या क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रांसह उंच भागातही टेकऑफ आणि लँडिंग करू शकते.


एलसीएच अटॅक हेलिकॉप्टर 'मिस्ट्रल' हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आणि हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र खास फ्रान्समधून आणलेले आहे.


एलसीएचमध्ये प्रत्येकी 70 मिमीच्या 12-12 रॉकेटच्या दोन पॉड आहेत. याशिवाय एलसीएमध्ये 20 मिमीची बंदूक बसवण्यात आली आहे, जी 110 अंशात कोणत्याही दिशेने फिरू शकते.


कॉकपिटची सर्व फिचर्स पायलटच्या हेल्मेटवर डिसप्ले केली जातात.


कारगिल युद्धानंतर भारताने स्वदेशी एलसीएच हेलिकॉप्टर तयार करण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्यावेळी भारताकडे असे अटॅक हेलिकॉप्टर नव्हते जे 15-16 हजार फूट उंचीवर जाऊन शत्रूचे बंकर्स नष्ट करू शकेल.हा प्रकल्प 2006 मध्ये मंजूर झाला होता.


गेल्या 15 वर्षांच्या मेहनतीनंतर हे लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर तयार करण्यात आले आहे.
 


एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या मते, एलसीएचमध्ये असे स्टेल्थ फिचर्स आहेत की ती शत्रूच्या रडारला सहजा सहजी सापडणार नाही. शत्रूचे हेलिकॉप्टर किंवा फायटर जेट त्याचे क्षेपणास्त्र एलसीएचवर लॉक केले तर ते त्याला चुकवू शकते.  या स्वदेशी एलसीएच हेलिकॉप्टरची चाचणी सियाचीन ग्लेशियर ते राजस्थानच्या वाळवंटात करण्यात आली आहे.