Lata Mangeshkar Death News: गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे.
लतादीदींच्या निधनावर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लतादीदींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. त्यांच्या निधनानं आपल्या देशात एक पोकळी निर्माण झाली आहे जी भरली जाऊ शकत नाही. येणाऱ्या पिढ्या त्याचं भारतीय संस्कृतीतील एक मोठं नाव म्हणून स्मरण ठेवतील, लतादीदींच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा
केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. संपूर्णपणे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.