Weather Update : उत्तर भारतातील पर्वतीय प्रदेशांमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. येणाऱ्या दिवसात आणखी थंडी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंडीगड, पश्चिमी उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पुढील दोन दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे. तसेच पुढचे तीन दिवस सकाळी आणि सायंकाळी दाट धुके पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच उत्तर भारतात आज जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शनिवारी दिवसभरात दिल्लीचा पारा घसरल्याने जोराची थंडीची नोंद झाली. दिल्ली-एनसीआरमध्येही आजची सकाळ धुक्याने सुरू झाली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत सकाळी धुके पडून दिवसभर हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 8 फेब्रुवारी रोजी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कधी उष्ण तर कधी थंडी
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी उष्णता असेल, तर कधी जोरदार वाऱ्यामुळे, उन्हाच्या तडाख्यातही थंडीचा अनुभव येईल. येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत हवामान फारसे उष्ण असणार नाही, कारण एकामागून एक येणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा थेट परिणाम उत्तर भारताच्या हवामानावर होत आहे. 6 फेब्रुवारीला म्हणजेच आज गिलगिट मुझफ्फराबाद, लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. काही भागात हिमवृष्टीही होऊ शकते. याशिवाय दक्षिण पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितली आहे. 8 फेब्रुवारीपासून वायव्य भारतातील किमान तापमानात पुन्हा वाढ होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: