CBI Summons Tejashwi Yadav: जमीन-नोकरी घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढत आहेत. सीबीआयनं (CBI) यापूर्वी लालू यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी (Rabri Devi) यांची चौकशी केली होती. तर आता सीबीआयनं आपला मोर्चा लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्याकडे वळवला आहे. या प्रकरणी सीबीआयनं तेजस्वी यादवला दुसऱ्यांदा समन्स पाठवलं आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना शनिवारी (11 मार्च) चौकशीसाठी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात बोलावण्यात आलं आहे.


सीबीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, यापूर्वी तेजस्वी यादव यांना 4 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी दिल्लीला बोलावण्यात आलं होतं आणि त्यासाठी त्यांना समन्स पाठवण्यात आलं होतं, परंतु सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनाचा दाखला देत ते दिल्लीला चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. आता त्यांना सीबीआयकडून पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.


दिल्ली, मुंबई ते पाटण्यापर्यंत छापेमारी


यापूर्वी, जमीन-नोकरीच्या घोटाळ्यासाठी, अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकांनी शुक्रवारी दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि पाटणामधील 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. लालू यादव यांच्या मुलींच्या घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. यासोबतच ईडीनं तेजस्वीच्या दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनी येथील घरावर छापा टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रं जप्त केली आहेत. ईडीच्या छाप्याच्या एका दिवसानंतर सीबीआयनं तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. 


छापेमारीत काय लागलं हाती? 


एजन्सीच्या सूत्रांनी 'पीटीआय'ला सांगितलं की, छाप्यांमध्ये 53 लाख रुपये रोख, USD 1900, सुमारे 540 ग्रॅम सोनं आणि 1.5 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. ईडीच्या छाप्यावरुन राष्ट्रीय जनता दलानं केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्रातील सत्ताधारी भाजप सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग यांसारख्या एजन्सींना राजकीय विरोधकांशी जुळवून घेण्यासाठी स्क्रिप्ट पुरवत असल्याचा आरोप आरजेडी नेत्यांनी केला आहे.  


15 मार्च रोजी हजर राहण्याचे निर्देश 


विशेष म्हणजे, या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं (CBI) लालू यादव, त्यांची पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि अन्य 14 जणांविरुद्ध गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींखाली आरोपपत्र दाखल केले आहे. राऊस अॅव्हेन्यू कोर्टानं सर्व आरोपींना 15 मार्चला हजर राहण्यास सांगितलं आहे.