नवी दिल्ली : गेल्या दहा महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनानं काल एक गंभीर वळण घेतलं आहे. उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांच्या मुलानं शेतकरी आंदोलकांवर गाडी घातल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत 8 जणांचा बळी गेला आहे. 


परवाच देशानं गांधीजयंती साजरी केली आणि अगदी दुसऱ्या दिवशीच उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये हे घडलं. केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलानं शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे.  तर दुसरीकडे शेतकऱ्यांनीही नंतर जाळपोळ केल्याचा दुसऱ्या बाजूचा आरोप आहे. हिंसाचाराच्या या तांडवात आत्तापर्यंत  8 जणांचा बळी गेलाय.


Lakhimpur Kheri : उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण तापलं, लखीमपूरला जाताना प्रियांका गांधींना अटक


केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा एक व्हिडिओ दहा दिवसांपासून व्हायरल झाला होता. ते लखीमपूरमधूनच भाजपचे खासदारही आहेत. "सुधर जाओ वरना 2 मिनिट लगेंगे हमे..."  अशा पद्धतीची भाषा त्यांनी शेतकरी आंदोलकांबाबत वापरली होती. रविवारी याच केंद्रीय मंत्र्याचा एक कार्यक्रम लखीमपूर होत आहे.  त्याला यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यही येत आहेत असं कळल्यावर शेतकऱ्यांनी तिथं निदर्शनं करायचा निर्णय घेतला आणि या निदर्शनाला नंतर हिंसक वळण लागलं..


लखीममपूरध्ये  कुस्तीच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य येणार होते. त्याआधीच शेतकऱ्यांनी तिथे निदर्शनं सुरु करुन हेलिकॉप्टर उतरु न देण्याचा इशारा  दिला.प्रदर्शन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्यंमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलानं  गाडी घातल्याचा आरोप केला आहे.   संतप्त शेतकऱ्यांनी नंतर 2 एसयूव्ही गाड्यांनाही आग लावल्याचा आरोप केला आहे.  हिंसेच्या या घटनांमुळे नंतर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी आपला कार्यक्रम रद्द केला


केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, त्यांच्या मुलावर हत्येचा गुन्हा दाखल करा आणि घटनेची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून करा अशा तीन मागण्या शेतकरी आंदोलकांनी केल्यात.


उत्तर प्रदेशच्या निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर आहेत. अशावेळी पश्चिम उत्तर प्रदेश..जिथं शेतकरी आंदोलकांची संख्या सर्वाधिक आहे तिथेच ही घटना घडली आहे. आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूंनी झाले आहेत. सत्य काय आहे ते न्यायालयाच्या चौकशीत समोर येईलच. पण या हिंसाचारामुळे शेतकरी आंदोलनाची ठिणगी पुन्हा पेटणार का हे ही पाहावं लागेल. 



महत्वाच्या बातम्या :