नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा (Ladki bahin Yojana) करिश्मा पाहायला मिळाला. यापूर्वी, मध्य प्रदेश सरकारनेही लाडली बहनाच्या माध्यमातून महिला वर्गास दरमहा 1200 रुपये देण्याची योजना सुरू केली होती. अर्थातच, राज्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार स्थापन झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे, महिला मतदार हा गेमचेंजिंग फॅक्टर ठरत असल्याचं दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुढील वर्षात होणाऱ्या दिल्ली (Delhi) विधानभा निवडणुकांच्या अगोदरच राजधानी दिल्लीतील केजरीवाल सरकारने महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. येथील लाडक्या बहिणींना म्हणजे प्रत्येक महिलांना दरमहा 1000 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी केली. 


दिल्लीत पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज दिल्ली सरकारने महत्वाकांक्षी आणि मोठ्या योजनांची घोषणा केली. त्यामध्ये, महिलांना दरमहा 1000 रुपये देण्याची सर्वात मोठी घोषणा केजरीवाल सरकारने केली आहे. तर, ऑटो रिक्षा चालकांनाही मोठा दिलासा देण्यात आला आहे. दिल्ली सरकारच्या कॅबिनेटने आज महिला सन्मान योजनेला मंजुरी दिली असून या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1000 रुपये दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे आजपासून महिलांना ते 1 हजार रुपये दिले जाणार असल्याचंही म्हटलं आहे. तर, दिल्लीत पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचं सरकार आल्यास ही रक्कम वाढून 2100 रुपये करण्यात येईल, अशी आश्वासन देणारी घोषणा देखील केजरीवाल सरकारने केली आहे. त्यामुळे, महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतही लाडकी बहीण योजना लागू झाल्याचं पाहायला मिळत आहे. 




दिल्लीतील ऑटो रिक्षावाल्यांसाठी 5 गॅरंटी


दिल्लीतील सर्वच रिक्षाचालकांना 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. 
रिक्षा चालकांच्या मुलींच्या लग्नासाठी 1 लाख रुपये आर्थिक मदत सरकारच्यावतीने केली जाईल
रिक्षा चालकांना वर्दी (गणवेश) घेण्यासाठी वर्षाला 2,500 रुपये शासनाकडून देण्यात येतील
केजरीवाल सरकारने घोषणा केली आहे की, सरकार रिक्षा चालकांच्या मुलांच्या कोचिंग क्लासेससाठी देखील विचार करणार आहे. 
तसेच, केजरीवाल सरकारने ‘पूछो अॅप’ पुन्हा नव्याने लाँच करण्यात येईल, असेही म्हटले. 


फेब्रुवारीमध्ये संपते दिल्ली सरकारची मुदत


दरम्यान, 70 सदस्य संख्या असलेल्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 मध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे, पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात येथे विधानसभेच्या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत.  दरम्यान, येथे 2015 आणि 2020 मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्षाने मोठं यश मिळवत 10 वर्षे सत्ता स्थापन केली. त्यामुळे, यंदा सत्तास्थापनेची हॅट्ट्रीक करण्यासाठी आप सज्ज असून आजच विविध घोषणांच्या माध्यमांतून दिल्लीतील जनतेला आकर्षित करण्यात आलं आहे. 


हेही वाचा


मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ