71st National Film Awards: काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली. अखेर पुरस्करांचं वितरण करण्यात आलं. शाहरुख खान, राणी मुखर्जी, विक्रांत मेस्सी यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर, साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तिन्ही सुपरस्टार 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले. तिन्ही सुपरस्टार्सना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

Continues below advertisement


बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला (Shah Rukh Khan) त्याच्या 'जवान' चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तसेच, राणी मुखर्जी, विक्रांत मेस्सी आणि दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल देखील उपस्थित होते. या सोहळ्याचे अनेक व्हिडीओ आता इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात चाहत्यांना त्यांचे लाडके राहुल आणि टीनाही दिसले. म्हणजेच, राणी मुखर्जी आणि शाहरुख खान यांना पाहून 'कुछ कुछ होता है'मधले राहुल आणि टीना आठवले. संपूर्ण सोहळ्यात दोघेही एकमेकांसोबत होते. तर, विक्रांत मेस्सीही सोहळ्यासाठी उपस्थित होता. 


शाहरुखला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार 


'जवान'ने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आणि जगभरात धमाकेदार कमाई केली. शाहरुख खाननं चित्रपटात दुहेरी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याच्या दमदार अभिनयानं हे सिद्ध केले की, तो केवळ रोमान्स किंग नाहीतर, प्रत्येक भूमिकेत जीव ओतणारा सुपरस्टार आहे.




राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार 


राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा 71 वा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनेत्रीला पुरस्कार प्रदान केला. 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयासाठी राणीला सन्मानित करण्यात आलं.


विक्रांत मेस्सीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार 


राणी मुखर्जी आणि शाहरुख खान व्यतिरिक्त, अभिनेता विक्रांत मेस्सीलाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. त्यानं '12th Fail'मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी त्याना गौरवण्यात आलं. याच सिनेमासाठी विधू विनोद चोप्रा यांनाही सन्मानित करण्यात आलं.


साऊथ सुपरस्टार 'मोहनलाल' यांचा मोठा सन्मान


सुपरस्टार मोहनलाल यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील आयुष्यभराच्या योगदानाची दखल घेतो. 


मोहनलाल हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव. त्यांनी चार दशकांत 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या अभिनयाची व्याप्ती कॉमेडीपासून थ्रिलर आणि गंभीर भूमिकांपर्यंत पसरलेली आहे. त्यांनी केवळ मल्याळम चित्रपटांमध्येच नाही तर तमिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.