LTTE Prabhakaran: पळा नेदुमरन कृष्णन पिल्लई पळानियाप्पन उर्फ पी नेदुमारन (P Nedumaran) यांनी लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन (LTTE Prabhakaran) जिवंत असल्याचा दावा केला आणि जगभरात एकच खळबळ उडाली. ज्या प्रभाकरनचा 2009 सालीच खात्मा केल्याचा दावा श्रीलंकेकडून करण्यात आला होता, तो प्रभाकरन आता पुन्हा सक्रिय होणार असल्याचं पी नेदुमारन यांनी म्हटलंय. एरवी इतर कोणी हा दावा केला असता तर त्याकडे दुर्लक्ष करता आलं असतं. पण पी नेदुमारन यांनी हा दावा केल्यानेच ही खळबळ उडाली. पी नेदुमारन ही अशी व्यक्ती आहे, ज्यांनी 1985 च्या दरम्यान अनेकदा श्रीलंकेचा गुप्त दौरा केला होता आणि ते स्वत: प्रभाकरनच्या संपर्कात होते. महत्त्वाचं म्हणजे नेदुमारन हे या आधी काँग्रेसचे नेते होते, त्यांनी एकदा इंदिरा गांधी यांचा जीवही वाचवला होता. 


P Nedumaran: तामिळ काँग्रेसचे नेते अन् तामिळ राष्ट्रवादी लेखक 


पी नेदुमारन हे तामिळनाडूतील तमिळ राष्ट्रवादी लेखक आणि काँग्रेसचे नेते आहेत.  त्यांनी तमिळ आणि इंग्रजीमध्ये अनेक पुस्तके लिहिली आहेत. पी नेदुमारन यांचा जन्म मदुराई या ठिकाणी झाला असून ते काँग्रेसचे त्यावेळचे राष्ट्रीय अध्यक्ष के कामराज यांच्या जवळचे सहकारी होते. ते तामिळ मासिक देन सेदी (Then Seidi) चे मुख्य संपादक आहेत. तसेच ते तामिळ राष्ट्रवादी चळवळीचे प्रमुख नेते आहेत. तामिळ भाषकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागतिक तामिळ परिषदेची (World Tamil Confederation) स्थापनाही त्यांनी केली आहे. 


Indira Gandhi : इंदिरा गांधींचा जीव वाचवला 


भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी 1979 साली तामिळनाडूला भेट दिली. ओपन टॉप जीपमध्ये असलेल्या इंदिरा गांधींच्यावर काही समाजकंटकांनी हल्ला केला. त्यावेळी पी नेदुमारन त्यांच्यासोबत जीपमध्ये बसले होते. पी नेदुमारन यांनी इंदिरा गांधींवर झालेला हल्ला हा आपल्यावर घेतला आणि त्यांचा जीव वाचवला. त्यानंतर नेदुमारन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इंदिरा गांधी यांनी नेदुमारन यांची रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली होती. 


LTTE Prabhakaran Arrested: प्रभाकरन याला सोडण्याची इंदिरा गांधी यांच्याकडे विनंती


सन 1982 साली तामिळनाडू पोलिसांनी चेन्नई येथे प्रभाकरन याला अटक केली होती. या अटकेनंतर तामिळनाडू तसेच श्रीलंकेतही गोंधळ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पी नेदुमारन यांनी त्याला सोडण्यात यावं अशी विनंती इंदिरा गांधी यांच्याकडे केली. नेदुमारन यांच्या विनंतीवरुन इंदिरा गांधी यांनी लगेच प्रभाकरनच्या सुटकेचे आदेश दिले. पण प्रभाकरनची ही सुटका मात्र भारताला महागात पडली. याच प्रभाकरनने नंतर राजीव गांधी यांची हत्या (Rajiv Gandhi Assasination Case) केली. 


Veerappan Kidnapped Dr Rajkumar: वीरप्पनची भेट आणि राजकुमार यांची सुटका 


पी नेदुमारन यांची आणखी एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे वीरप्पनच्या तावडीतून राजकुमार यांची सुटका. कन्नड चित्रपट अभिनेते डॉ. राजकुमार यांचे कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनने अपहरण केल्यानंतर तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी कोणत्याही क्षणी दंगली भडकण्याची शक्यता होती. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेता दोन्ही राज्यांच्या प्रमुखांनी पी नेदुमारन यांच्याकडे मध्यस्थी करण्याचं साकडं घातलं. त्यानुसार पी नेदुमारन यांनी वीरप्पनची भेट घेतली आणि राजकुमार यांची सुटका केली. 


Jafna Tamil People : श्रीलंकेतील तामिळांना मदत करण्यासाठी मोहीम


श्रीलंका सरकारच्या आर्थिक नाकेबंदीमुळे जाफनामध्ये राहणाऱ्या तामिळ वंशाच्या लोकांची परिस्थिती बिकट झाली. त्यांना अन्नही मिळणं अवघड झालं होतं. त्यावेळी पी नेदुमारन यांनी पुढाकार घेतला आणि तामिळ वंशाच्या लोकांसाठी अन्न आणि औषधे गोळा करण्यासाठी मोहीम सुरू केली, त्या माध्यमातून एक कोटी रुपये जमवले. ही मदत जाफनाला पाठवण्यासाठी त्यांनी इंडियन रेडक्रॉस सोसायटीची मदत घेतली. पण भारत सरकारने या मदतीच्या विनंतीला 10 महिन्याहून अधिक काळ प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पी नेदुमारन यांनी अनेक आंदोलनं केली, पण ती सर्व व्यर्थ ठरली. 


यानंतर आपण स्वत: बोटीतून जाणार आणि जाफनातील तामिळ वंशाच्या लोकांची मदत करणार असं पी नेदुमारन यांनी जाहीर केलं. तमिळनाडू पोलिसांनी त्यांना यापासून रोखलं. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत त्यांनी आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. 


P Nedumaran on LTTE Prabhakaran: प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा


पी नेदुमारन यांनी 1985 च्या दरम्यान श्रीलंकेत अनेक गुप्त दौरे केल्याचं उघड झालं. या काळात त्यांनी लिट्टेच्या प्रभाकरनच्या भेटीही घेतल्या. जाफना प्रांतात श्रीलंकेच्या लष्कराने जो उच्छाद मांडला होता त्याचं सर्व चित्रिकरण करुन ते जगासमोर मांडण्यात पी नेदुमारन यांचा मोठा हात होता. 


लिट्टेचा प्रभाकरन जिवंत असून तामिळ वंशाच्या लोकांच्या अधिकारासाठी तो लवकरच पुन्हा सक्रिय होणार असल्याचा दावा आता पी नेदुमारन यांनी केला आहे. आपल्या आयुष्यात अनेक मोठ्या 'डील' केलेल्या, प्रभाकरनसोबत खास संबंध असलेल्या पी नेदुमारन यांनी हा दावा केल्याने त्याकडे गांभिर्यानं पाहिलं जातंय. 


Srilanka Reaction On LTTE Prabhakaran: नेदुमारन यांचा दावा श्रीलंकेने फेटाळला 


श्रीलंकन लष्कराने प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा फेटाळला आहे. प्रभाकरनचा मृतदेह सापडल्यानंतर आम्ही त्याचे सर्व डीएनए रिपोर्ट तपासले होते आणि त्यानंतरच त्याच्या मृत्यूची घोषणा केली होती असं ते म्हणाले. तर श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साब्री यांनी यासंबंधित सर्व अहवाल तपासले जातील आणि नंतर भाष्य केलं जाईल असं म्हणाले. 


ही बातमी वाचा: