Monkeypox Cases in India : जगभरात मंकीपॉक्स (Monkeypox) व्हायरसच्या केसेसचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच परदेशातून आलेल्या कन्नूर येथील एका सात वर्षांच्या चिमुरडीला मंकीपॉक्सची लक्षणं आढळून आल्याने तिला कन्नूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, मुलगी आणि तिचे पालक 27 जुलै रोजी यूकेहून आले होते. सुरुवातीला या मुलीच्या पालकांना मुलीच्या त्वचेवर पुरळ दिसले होते. त्यानंतर त्यांनी बालरोगतज्ज्ञांकडे नेले. डॉक्टरांना मंकीपॉक्सचा संशय आल्याने मुलीला त्वरित वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले.  


यावेळी रुग्णालयाचे अधीक्षक के. सुदीप यांनी सांगितले की, मुलीची लक्षणे ही मंकीपॉक्सचीच आहे का या संदर्भात सध्या चाचणी सुरु आहे. मुलीचे घेतलेले नमुने अलाप्पुझा येथील ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र, मुलीचे रिपोर्ट्स येईपर्यंत पालकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.    


दरम्यान, काही दिवसांपूर्वी दुबईहून आलेल्या एका 31 वर्षीय व्यक्तीची मंकीपॉक्सची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. संबंधित व्यक्ती बरी झाल्यानंतर गेल्या शनिवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान त्यांच्या कुटुंबातील एकाही सदस्यामध्ये मंकीपॉक्सची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत.


मंकीपॉक्सची लक्षणं काय? 
तज्ज्ञांच्या मते 'मंकीपॉक्स' हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.


कसा वाढतो संसर्गाचा धोका?
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ‘मंकीपॉक्स’ची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो.