तिरुवनंतपुरम: केरळचे प्रसिध्द शबरीमला मंदिर बुधवारपासून खुलं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या मकरविलक्कू या उत्सवासाठी बुधवारी संध्याकाळी पाच वाजता हे मंदिर खुलं करण्यात येत असून भाविकांना गुरुवारपासून दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.


त्रावणकोर देवसोम बोर्डने या संबंधी एक निवेदन प्रसिध्द केलं असून 31 डिसेंबर ते 19 जानेवारीपर्यंत भाविकांना भगवान अयप्पाच्या दर्शनासाठी हे मंदिर खुलं राहणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर 20 जानेवारीला हे मंदिर पुन्हा बंद करण्यात येणार आहे.


रोज पाच हजार भक्तांना दर्शन
भाविकांना 28 डिसेंबरपासून दर्शनासाठी मंदिराच्या वेबसाइटवरुन क्यू बुकिंग करता येणार आहे. त्या आधारे रोज केवळ पाच हजार भाविकांना दर्शन देण्यात येणार असल्याचं बोर्डने स्पष्ट केलं आहे.


त्रावणकोर देवसोम बोर्डने प्रसिध्द केलेल्या निवेदनात सांगण्यात आलंय की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना कोविड 19 चे निगेटिव्ह प्रमाणपत्रक बंधनकारक असणार आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना 48 तासांपूर्वीचा कोरोना निगेटिव्ह अहवाल सादर करावा लागणार आहे. ज्यांच्याकडे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्रक नसेल त्यांना अयप्पा मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मंदिर परिसरात कोरोना चाचणीची कोणतीही सुविधा उपलब्ध नसणार असल्याचं बोर्डने स्पष्ट केलंय.


मकरवलक्कू हा शबरीमाला मंदिरात दरवर्षी साजरा करण्यात येणारा उत्सव आहे. या उत्सवाच्या दरम्यान सलग 41 दिवस या मंदिरात पूजा करण्यात येते. कोरोनामुळे हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलं होतं.


संबंधित बातम्या: