नवी दिल्ली : केजरीवाल सरकारने दिल्लीकरांना मोठा झटका दिला आहे. दिल्ली सरकारने घरात पुरवठा होणाऱ्या पाण्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.


मंगळवारी झालेल्या दिल्ली बोर्डाच्या बैठकीत पाण्याच्या किमतीत वाढ करण्याबाबत एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यामुळे दिल्लीमध्ये पाण्याच्या दरात 20 टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे.

तर 20 हजार लिटरपर्यंत पाण्याचा वापर करणाऱ्यांना मात्र पाणी मोफत मिळणार आहे. या निर्णयाचा अर्थ असा की, "20 हजार लिटरपेक्षा जास्त पाण्याचा वापर करणाऱ्यांना आता पाण्याच्या बिलावर 20 टक्के जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.


दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षाने दिल्लीकरांना स्वस्त वीज आणि मोफत पाणी देण्याचं आश्वासन दिलं होतं. सत्तेत आल्यानंतर आपलं आश्वासन पूर्ण करताना केजरीवाल सरकारने 20 हजार लिटरपर्यंत पाणी मोफत दिलं होतं

या निर्णयावर करावल नगरमधील आमदार आणि माजी जलसंपदा मंत्री कपिल मिश्रा यांनी केजरीवाल सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. "दिल्ली सरकारने पाण्याचा दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अचानक असा निर्णय का घेतला? अरविंद केजरीवाल जलसंपदा मंत्री बनताच दिल्ली जल बोर्ड अचानक तोट्यात गेलं का? दिल्लीकरांचा हा विश्वासघात आहे. दर न वाढण्याचं आश्वासन दिलं होतं", असं ट्वीट कपिल मिश्रा यांनी केलं आहे.



दरम्यान या विषयावर केजरीवाल सरकारकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.