Kedarnath Yatra 2023: केदारनाथ यात्रेचा (Kedarnath Yatra 2023) पहिला टप्पा जवळपास संपत आला आहे. पण या पवित्र यात्रेशी संबंधित एका वेदनादायी व्हिडिओने लोकांना विचार करण्यास भाग पाडलं आहे. केदारनाथ यात्रा आरामदायी करण्यासाठी काही भाविक घोड्यावरुन प्रवास करतात, त्यांचे अवजड सामान मंदिरापर्यंत नेण्यासाठी घोड्याचा किंवा खेचराचा वापर करतात हे सर्वांनाच माहित आहे. पण अवजड वजन उचलण्यासाठी मुक्या प्राण्यांवर किती अत्याचार केले जातात हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर हे व्हिडिओ तुमचे डोळे उघडतील. यातील एका व्हायरल व्हिडीओमध्ये घोड्याने अधिक वजन वाहून न्यावे यासाठी त्याला अंमली पदार्थ पिण्यास भाग पाडलं जात असल्याचं दिसत आहे.
घोडे चालकावर गुन्हा दाखल
सध्या सोशल मीडियावर केदारनाथचे दोन व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एका घोड्याला जबरदस्ती गांजा पाजला जातोय, तर दुसऱ्या व्हीडिओत घोड्यांना आणि खेचरांना अमानुषपणे मारहाण केली जात असल्याचे दिसून आले. या अमानवी कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुद्रप्रयाग पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि घोडे चालकाविरुद्ध आयपीसी कलम आणि प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घोडे चालकासह अशाच प्रकारचे कृत्य करणाऱ्या इतर लोकांवरही आयपीसी आणि प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
घोड्यांना/खेचरांना दिली जाते अमानुष वागणूक
केदारनाथ पादचारी मार्गावर घोडे-खेचर चालकांकडून घोडे आणि खेचरांना अमानुष वागणूक दिली जात आहे. घोड्यांनी आणि खेचरांनी अधिक काळ काम करावे आणि जास्त वजनाचे सामान उचलावे, यासाठी त्यांना गांजा पाजला जातो. या गांजाच्या नशेमध्ये घोडे चालत राहतात आणि जेव्हा नशा उतरते तेव्हा हे घोडे जमिनीवर कोसळतात, अशा वेळी त्यांच्यावर प्रवास करणारे प्रवासी आणि सामान हे देखील खाली पडते. अशा परिस्थितीत, घोडे चालक या घोड्यांना काठीने बेदम चोप देतात आणि पुन्हा उभे राहून चालण्यास भाग पाडतात.
केदारनाथ यात्रेदरम्यान 60 हून अधिक घोड्यांचा मृत्यू
केदारनाथ यात्रा 2023 दरम्यान घोडे आणि खेचरांसोबत अमानुष कृत्य केले जात असल्याचं समोर आलं. घोडे चालकांकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे अनेक घोड्यांना जखमा झाल्या, तर आतापर्यंत 60 हून अधिक घोड्यांचा मृत्यू झाला. हे सर्व प्रकार लक्षात घेत अनेक भाविकांनी आणि प्राणीप्रेमींनी सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला. संबंधित प्रकारांनंतर अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी योग्य ते पाऊल उचलून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
स्वार्थासाठी घोडे चालक घोड्यांना देतात नशेचे पदार्थ
केदारनाथ धामचा प्रवास हा एक कठीण प्रवास मानला जातो. वाहनांमधून गौरीकुंड गाठल्यानंतर सुमारे 18 किमीचा चढ चढून वर पोहोचावं लागतं. केदारनाथ यात्रेदरम्यान केदारनाथ धाम मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असतात. काहीजण डोलीत बसून मंदिर गाठतात, तर काही भाविक घोडे किंवा खेचरांचा आधार घेतात. परतीच्या वेळचा प्रवास देखील असाच असतो. केदारनाथचा प्रवास सोयीचा व्हावा म्हणून घोड्यांचा वापर केला जातो, मात्र घोडे चालक त्यांच्या स्वार्थासाठी घोड्यांना क्रूर वागणूक देतात. जास्त काळ घोडे किंवा खेचर यांनी प्रवास करावा, यासाठी त्यांना नशेचे पदार्थ पाजले जातात. जास्त कमाई करता यावी, यासाठी घोड्यांवर चालकांकडून अमानवी प्रयोग केले जातात. हा सर्व प्रकार लक्षात घेत बऱ्याच भाविकांनी तक्रारी केल्या. मुक्या प्राण्यांवर होत असलेल्या क्रूरतेच्या तक्रारी प्राप्त झाल्याने पोलिसांनी गुन्हे नोंदवून घेत आवश्यक ती कार्यवाही सुरू केली आहे.
हेही वाचा: