चिमुकलीचा मृतदेह पिशवीत, नाल्यात छिन्नविछिन्न मृतदेह आढळला
एबीपी माझा वेब टीम | 16 Apr 2018 10:05 AM (IST)
टिटोली गावातील एका नाल्यात 8 ते 10 वर्षाच्या मुलीचा छिन्नविछिन्न मृतदेह सापडला आहे.
चंदीगड: उन्नाव, कठुआ आणि सुरतनंतर आता हरियाणातील रोहतकही बलात्काराच्या घटनेने हादरलं आहे. टिटोली गावातील एका नाल्यात 8 ते 10 वर्षाच्या मुलीचा छिन्नविछिन्न मृतदेह सापडला आहे. या चिमुकलीवर बलात्कार करुन हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. धक्कादायक म्हणजे हा मृतदेह एका पिशवीत घालून, ती पिशवी नाल्यात फेकून देण्यात आली. मृतदेह अत्यंत विद्रूप अवस्थेत आहे. मृतदेहाच्या एका हाताचा पंजाही गायब आहे. सध्या केवळ हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर या मुलीवर अत्याचार झालेत की नाही ते समोर येईल. मात्र मृतदेहाची अवस्था पाहता, ही बलात्कारानंतर केलेली हत्या असल्याचं दिसून येतं. कारण मुलीच्या गुप्तांगावर जखमेचे निशाण आहेत. ही हत्या चार-पाच दिवसांपूर्वी केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. टिटोली गावातील एक शेतकरी सोमवारी सकाळी शेतात काम करत होता. त्यावेळी त्याला एका नाल्यात पिशवी दिसली. त्या पिशवीतून हात बाहेर आला होता. त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पिशवी उघडली. त्यावेळी त्यामध्ये मुलीचा मृतदेह असल्याचं उघड झालं.