Terrorist Attack on Kashmiri Pandits : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे काश्मिरी पंडितांवरील हल्ले थांबण्याची चिन्हे दिसत नाही. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांना लक्ष्य केले (Terrorist Attack On ) आहे. दहशतवाद्यांनी दोन काश्मिरी पंडितांवर गोळीबार केला. यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे. हे दोघेही भाऊ असल्याची माहिती आहे.
शोपिया जिल्ह्यातील चोटीगाम गावात ही घटना घडली. सुनील कुमार आणि पिंटू कुमार या दोन भावांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. हल्ल्याच्या वेळी हे दोघेजण सफरचंदाच्या बागेत होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी केली असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
जम्मू-काश्मीरचे आयजीपी यांनी म्हटले की, महिला, बालके, निशस्त्र पोलीस कर्मचारी आणि स्थलांतरीत मजूरांसह निर्दोष नागरिकांना लक्ष्य करून दहशतवादी काश्मीर खोऱ्यात शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना खीळ बसवू शकत नाही. काश्मीरमधील सर्व भागात दहशतवाद्यांविरोधात, विशेषत: दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरूच राहणार आहे. काही दिवसांपूर्वी बांदिपोरामध्ये दहशतवाद्यांनी एका मजूरांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
काही दिवसांपूर्वीच बडगाम जिल्ह्यात वाटरहेल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दहशतवादी लतीफ राथरचा खात्मा करण्यात यश मिळाले होते. दहशतवादी लतीफ हा काश्मीर खोऱ्यातील 'टार्गेट किलिंग'मध्ये सहभागी होता.
काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, दहशतवादी लतीफ राथरने काही निर्दोष नागरिकांची हत्या केली होती. राहुल भट आणि आमरीन भट यांच्या हत्येतदेखील त्याचा सहभाग होता.
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ओवैसी यांनी म्हटले की, काश्मीरमध्ये भाजपने नियुक्त केलेले नायब उपराज्यपाल आहेत. पंतप्रधान मोदी यांचे प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. जम्मू-काश्मीरसाठी विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद 370 रद्द केल्याने काश्मिरी पंडितांना फायदा होईल, असे सांगितले जात होते. मात्र, काश्मिरी पंडित असुरक्षित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचे हे अपयश असून गृहमंत्री अमित शाह यांनी यावर उत्तर द्यायला हवं अशी मागणी त्यांनी केली.