नवी दिल्ली (एएनआय): 'आयएनएक्स मीडिया' घोटाळा प्रकरणी दोन वर्षांपूर्वी सीबीआयनं हे प्रकरण दाखल करून घेतलं. दोन वर्षांच्या तपासानंतर आता या प्रकरणी सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं आहे. या प्रकरणातील एकूण चौदा आरोपींमध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, कार्ति चिदंबरम, त्याचा अकाऊंटंट, आयएनएक्स मीडिया, या कंपनीचा माजी संचालक पीटर मुखर्जी, दोन अन्य कंपन्या आणि काही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.


आयएनएक्स मीडियाची माजी संचालक इंद्राणी मुखर्जी ही माफीचा साक्षीदार ठरल्यानं तीचे नाव या केसमधून वगळण्यात आले आहे. येत्या २१ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची दखल विशेष न्यायालयाद्वारे घेण्यात येईल. परकीय गुंतवणूक प्रोत्सहन मंडळ (एफआयपीबी)मार्फत 'आयएनएक्स मीडिया प्रा. लि.' आणि 'आयएनएक्स न्यूज प्रा. लि.'ला मान्यता मिळावी, यासाठी पीटर आणि इंद्राणी यांनी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक इथे पी. चिदंबरम यांची भेट घेतली होती. या भेटीत चिदंबरम यांनी मुखर्जी दाम्पत्याकडे बेकायदेशीर मागण्या केल्याचं या आरोपपत्रातून समोर आलंय. याशिवाय, आपला मुलगा कार्ति चिदंबरम याचे व्यावसायिक हितसंबंध जपण्याचीही अपेक्षा चिदंबरम यांनी मुखर्जी दाम्पत्याकडे व्यक्त केली.

'आयएनएक्स मीडिया' या कंपनीतील पैशांच्या स्रोतांबद्दल चिदंबरम यांच्याकडे भाजप नेते मुरलीमनोहर जोशी आणि अविनाश राय खन्ना यांनी तक्रारी दाखल करूनही, चिदंबरम यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही सीबीआयनं या आरोपपत्रात म्हटलं आहे.

२००७मध्ये 'आयएनएक्स मीडिया' या कंपनीला अर्थमंत्री असताना 'एफआयपीबी'द्वारे अवैध मार्गानं ३०५ कोटी रूपये मिळवून दिल्याच्या आरोपाखाली चिदंबरम यांना गेल्या ऑगस्टमध्ये सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. सध्या चिदंबरम तिहार जेलमध्ये आहेत.