लखनऊ : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची दुपारी अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. लखनऊ नाका भागात कमलेश तिवारी यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. कमलेश तिवारी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ट्रॉमा सेंटरमध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर फरार झाले आहेत.

मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कमलेश तिवारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली होती. कमलेश तिवारी हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष होते. हत्येनंतर लखनऊमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला असून  बाजारपेठेतील दुकानंही बंद करण्यात आली आहे.

लखनऊ नाका भागात तिवारी यांचे कार्यालय आहे. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तिवारी यांच्या कार्यालयात दोन अज्ञात व्यक्ती त्यांना भेटायला आल्या होत्या. दोघांकडे मिठाईचा डबा होता. मिठाईच्य़ा डब्यात चाकू आणि गावठी पिस्तुल होतं. कमलेश तिवारी यांना भेटवस्तू देण्याच्या निमित्ताने ते त्यांच्या कार्यालयात शिरले. त्यानंतर हल्लेखोरांनी तिवारी यांच्यासोबत चर्चा केली आणि चहा देखील घेतला. तिथे त्यांनी कमलेश तिवारींवर गोळी झाडली आणि पळ काढला. तिवारी रक्ताच्या थारोळ्यात होते, त्यांना तातडीने ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले मात्र तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांवरही निष्काळजीपणाचा आरोप केला जातो आहे. कारण कमलेश तिवारी यांचा नोकर अर्धा तास १०० हा नंबर डायल करत होता, मात्र फोन लागला नाही. घटना घडल्यावर अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळाने पोलीस पोहचले असेही तिवारी यांच्या नोकराने सांगितले.