Uttar Pradesh Election 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या देशात सुरू आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान  प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. 11 जिल्ह्यांतील 58 विधानसभा जागांसाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश जागांवर मतदान होणार आहे. मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासू सुरू होणार असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या भागात शेतकरी व जाट यांचे प्राबल्य आहे, त्यामुळे यावेळी शेतकरी आंदोलनामुळे येथील समीकरण गेल्या निवडणुकीपेक्षा काहीसे वेगळे मानले जात आहे. 


पश्चिम उत्तर प्रदेशात 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 58 पैकी 53 जागा जिंकून मोठी आघाडी घेतली होती. मात्र यावेळी ते तितकेसे सोपे मानले जात नाही. यावेळी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि आरएलडीचे जयंत चौधरी या निवडणुकीत एकत्र आले आहेत. पश्चिम उत्तर प्रदेश हा आरएलडीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, वडील अजित सिंह यांच्या निधनानंतर जयंत चौधरी यांची ही पहिलीच परीक्षा आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमधून भाजप, बसपा आणि काँग्रेसने 58 उमेदवार उभे केले आहेत. तर समाजवादी पक्षाचे 28, आरएलडीचे 29 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार रिंगणात आहे. या तिन्ही पक्षांची युती आहे.


मागच्या निवडणुकीत या 58 जागांपैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?


भाजपने 53 जागा जिंकल्या
समाजवादी पक्षाने दोन जागा जिंकल्या
बसपाने दोन जागा जिंकल्या
आरएलडीला केवळ एक जागा मिळाली होती.


दरम्यान, मतदानाच्या आधी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये योगी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दिसत आहेत. पंतप्रधान मोदी योगींचा हात धरून विजयी मुद्रेत उभे आहेत. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी देखील ट्वीट केले आहे की, प्रिय लोकांनो, तुम्ही मतदान करणार नाही, तुम्ही तुमचे भविष्य निवडणार आहात. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील 58 जागांच्या निवडणुकीसाठी एकूण 10,853 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. तसेच मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनत करण्यात आला आहे.