बंगळुरु : केएसआरटीसी अर्थात कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये आता चालक महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. कर्नाटक सरकार हा महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

केएसआरटीसी आणि बीएमटीसी अर्थात बंगळुरु मेट्रोपॉलिटन वाहतूक महामंडळामध्ये महिला चालकांना 50 आरक्षण देण्याचं धोरण कर्नाटक सरकार आखणार आहे. कर्नाटक व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास महामंडळ महिला उमेदवारांना बस चालवण्याचं प्रशिक्षण देणार आहे.

कर्नाटकचे परिवहन मंत्री एच एम रेवण्णा यांच्या अध्यक्षतेत केएसआरटीसी आणि बीएमटीसीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. अवजड वाहनांवर चालक म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरण आखण्याची सूचना मंत्र्यांनी दिली.

इच्छुक महिला उमेदवारांना प्रशिक्षण देऊन स्टायपेंडही देण्यात येईल. त्यानंतर संबंधित महिलांना सेवेत सामावून घेण्यात येईल. आरक्षण लागू झाल्यास राज्याच्या परिवहन सेवेत महिलांना चालकपदासाठी 50 टक्के कोटा देणारं कर्नाटक हे पहिलंच राज्य ठरेल. महिलांना अवजड वाहनं चालवण्यासाठी मोफत प्रशिक्षण देण्यासोबतच वाहन परवानाही मोफत देण्यात येईल.