Karnataka floor test: बंगळुरु: सुप्रीम कोर्टात मध्यरात्री 2 ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, येडियुरप्पा यांनी गुरुवारी सकाळी 9 वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपिनियतेची शपथ दिली.
एकट्या येडियुरप्पांनी गुरुवारी शपथ घेतली. मात्र त्यांना आज बहुमत सिद्ध करायचं आहे.
सुप्रीम कोर्टाने राज्यपालांनी बहुमतासाठी दिलेली 15 दिवसांची मुदत रद्द करत भाजपला झटका दिला. तसंच आज दुपारी 4 वा. बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी ते 2007 आणि 2008 मध्ये मुख्यमंत्रीपदी होते.
2007 मध्ये केवळ सातच दिवसात त्यांना मुख्यमंत्रीपद सोडायला लागलं होतं. त्यावेळची राजकीय परिस्थिती आणि आजची राजकीय परिस्थिती वेगळी असली, तरी तेव्हाप्रमाणेच आताही येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आहे.
2007 ची परिस्थिती
येडियुरप्पा हे 2007 साली पहिल्यांदा सत्तेत आले. त्यावेळी त्यांनी कुमारस्वामी यांच्या जनता दलाला मदत केली होती. भाजप-जेडीएस यांच्या युतीने काँग्रेसच्या धरम सिंह यांचं सरकार पाडलं होतं.
त्यावेळी भाजप-जेडीएस यांच्यात करार झाला. त्यानुसार आधी कुमारस्वामींना 20 महिने मग येडियुरप्पांना 20 महिने मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं.
भाजपच्या मदतीने कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले, तर येडियुरप्पा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले.
मग ऑक्टोबर 2007 मध्ये कुमारस्वामींची 20 महिन्यांची मुदत संपली आणि येडियुरप्पा मुख्यमंत्री होण्याची वेळ आली, तेव्हा कुमारस्वामींनी शब्द फिरवला. येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला.
त्यामुळे चिडलेल्या येडियुरप्पा आणि त्यांच्या पक्षातील मंत्र्यांनी 5 ऑक्टोबर 2007 ला राजीनामा दिला. भाजपने अधिकृतरित्या कुमारस्वामींच्या सरकारचा पाठिंबा काढला.
परिणामी कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू झाली. मात्र 7 नोव्हेंबर 2007 पर्यंत भाजप-जेडीएसने पुन्हा आपापसातील वाद मिटवल्याने राष्ट्रपती राजवट शिथील झाली.
जेडीएसने येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला. येडियुरप्पांनी 12 नोव्हेंबर 2007 रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली.
मात्र मंत्रिपदांवरुन जेडीएस-भाजपमध्ये पुन्हा बिनसलं आणि अवघ्या सात दिवसात म्हणजेच 19 नोव्हेंबर 2007 रोजी सरकार ढासळलं आणि येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं.
2008 ची निवडणूक
2008 च्या विधानसभा निवडणुकीत बी एस येडियुरप्पा यांनी शिकारीपुरा मतदारसंघात मोठा विजय मिळवला, त्यांच्या नेतृत्त्वात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आणि सत्तेत आला. तेव्हा भाजपने स्वबळावर सरकार स्थापन केलं आणि 30 मे 2008 रोजी येडियुरप्पा यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मात्र तीन वर्षांनी खाण आणि जमीन घोटाळ्याच्या/भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन 2011 साली येडियुरप्पांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं.
2018 ची निवडणूक
2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने 222 पैकी 104 जागा मिळवल्या. मात्र बहुमतापासून 8 जागा दूर राहिला.
पण तरीही सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं. काँग्रेस-जेडीएसने आक्षेप घेतल्याने हे सर्व प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. तिथेही येडियुरप्पांना हिरवा कंदिल मिळाला.
17 मे 2018 रोजी येडियुरप्पांनी तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
सुप्रीम कोर्टाचे आदेश
कर्नाटक विधानसभेत आज मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांची अग्निपरीक्षा आहे. कारण सुप्रीम कोर्टाने झटका देत येडियुरप्पांना आज दुपारी 4 वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान
सध्या कर्नाटकात भाजप 104, काँग्रेस 78, जेडीएस 38 अन्य/अपक्ष 2 अशी स्थिती आहे. या परिस्थितीत काँग्रेस-जेडीएसने आघाडी केल्याने त्यांची संख्या 116 वर पोहोचली आहे.
दुसरीकडे भाजपकडे स्वतःचे 104 आमदार आहेत. जर अपक्ष, केपीजेपी आणि बसपाचा एक आमदार सोबत आला, तर हा आकडा 107 होईल. मात्र तरीही भाजपकडे 112 हा आकडा गाठण्यासाठी जागा कमी पडतील. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या सात लिंगायत आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा भाजपचा दावा आहे. काँग्रेसच्या सात आमदारांनी पाठिंबा दिल्यास एकूण आकडा 114 होईल. मात्र भाजपचा हा दावा Anti-defection law च्या विरोधात आहे.
या परिस्थितीमध्ये सभागृहात अविश्वास ठराव पास करायचा असेल, तर काँग्रेसच्या त्या सात आमदारांना गैरहजर रहावं लागेल, किंवा राजीनामा द्यावा लागेल. तेव्हा विधानसभेत 215 आमदार उरतील. यानंतर बहुमताचा आकडाही घटून 108 वर येईल. मात्र तरीही भाजपला एक आमदार कमी पडणार आहे.
त्यामुळे 2007 मध्ये येडियुरप्पांसाठी मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी जी धावाधाव करावी लागली होती, तीच परिस्थिती सध्या दिसत आहे.
काँग्रेस-जेडीएसचं सरकार कसं स्थापन होईल?
कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेसला 78 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएसला मुख्यमंत्रिपदाची ऑफर देत समर्थनाची घोषण केली. त्यामुळे काँग्रेसचे 78 आणि जेडीएसच्या 38 जागा मिळून आकडा 116 होत आहे, जो बहुमतापेक्षा चारने जास्त आहे.
नियम काय सांगतो?
राज्यपाल अगोदर सरकार स्थापनेसाठी सर्वात मोठ्या पक्षाला निमंत्रण देतात. मात्र गोवा आणि मणिपूरमध्ये राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला निमंत्रण दिलं होतं. या दोन्हीही ठिकाणी निमंत्रण मिळणाऱ्या पक्षाने सभागृहात बहुमत सिद्ध करण्यात यश मिळवलं.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018
भाजप 104
काँग्रेस 78
जनता दल (सेक्युलर) 37
बहुजन समाज पार्टी 1
कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1
अपक्ष 1
संबंधित बातम्या :
एकट्या येडियुरप्पांनीच शपथ घेतली, कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान!
काँग्रेसच्या 7 लिंगायत आमदारांवर भाजपची मदार
कर्नाटकात रिसॉर्ट पॉलिटिक्स, काँग्रेसकडून 100 रुम बूक
कर्नाटकात भाजपची काल रात्री एक जागा कमी झाली, आज वाढली!