बंगळुरु: ब्रेनडेड घोषित केलेल्या 12 वर्षाच्या एका मुलाच्या कुटुंबाने त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर इतर दोन मुलांचा जीव वाचणार आहे. संजय असं या ब्रेनडेड झालेल्या मुलाचं नाव असून त्याचे हृदय झडप, यकृत आणि किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. या अवयवदानाच्या निर्णयानंतर आरोग्य विभागाने या कुटुंबाचे 1.35 लाख रुपयांचे बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. 


रविवारी पहाटे जक्कूर उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात संजय गंभीर जखमी झाला, असे त्याचे काका गोविंदप्पा यांनी सांगितले. त्याचा अपघात हा धक्कादायक होताच पण त्या मुलाचं ब्रेनडेड होणं हे अधिक धक्कादायक होतं. त्यानंतर 1.35 लाख रुपयांचे बिल जमा करण्याच्या चिंतेने आंध्र प्रदेशातील रोजंदारी कामगार असलेले त्याच्या गरीब पालक चिंतेत होते.


आरोग्य विभागाने त्यांना सांगितले की, आंध्र प्रदेश सरकारचे हेल्थ कार्ड कर्नाटकात लागू होत नाही. मग त्या मुलाच्या आईचे दागिने गहाण ठेवून 65,000 रुपये डिपॉझिट करण्यात आले. त्यानंतर आरोग्य विभागाने उर्वरित 1.50 लाख रुपयांचे बिल माफ केलं. 


इयत्ता 5वीत शिकणारा संजय शनिवारी संध्याकाळी 5 वाजता आंध्र प्रदेशातील त्याच्या गावातून त्याच्या आईसोबत जक्कूर फ्लायओव्हरजवळ त्याच्या मावशीच्या घरी आला होता. त्यानंतर रविवारी सकाळी 7.30 च्या सुमारास या फ्लायओव्हरवर हा अपघात घडला. 


त्या मुलाचे अवयवदान केल्यानंतर त्याच्या कुटुंबाला भीती होती की गाववाले त्यांच्यावर अवयव विक्रीचा आरोप करतील. त्यानंतर प्रशासनाने स्पष्ट केलं की अवयव दान केल्यानंतर संबंधित कुटुंबाला किंवा सरकारला यामध्ये कोणताही वैयक्तिक फायदा होत नाही. 


कर्नाटकमध्ये एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबाकडे जर आरोग्य कर्नाटक कार्ड असेल तर आणि त्या व्यक्तीला जर तात्काळमध्ये खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असेल तर त्या व्यक्तीचे संपूर्ण बिल माफ केलं जातं. हे बीपीएल कुटुंबासाठी लागू होतं. जर ती व्यक्ती गरिबी रेषेच्या वरती असेल तर त्या उपचाराच्या 30 टक्के खर्च हा माफ केला जातो.