Priyanka Gandhi : सध्या राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. आगामी राज्यसभा निवडणुकीनंतर संपूर्ण गांधी परिवार आता संसदेच्या सभागृहात दिसणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना राज्यसभेत पाठवण्यासाठी काँग्रेसच्या एका गटाकडून लॉबिंग सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सध्या जरी प्रियंका गांधींच्या नावाची चर्चा सुरु असली तरी अंतिम निर्णय या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी घेणार आहेत.
राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावांबाबत काँग्रेसमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्ष यावेळी प्रियांका गांधी यांना राज्यसभेवर पाठवणार का? याबाबत निर्णय होणार का? हा मोठा प्रश्न आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाचे काही नेते यावेळी सरचिटणीस प्रियांका गांधी यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या बाजूने आहेत. त्यांनी या संदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुका अजून दूर आहेत आणि अशा परिस्थितीत प्रियंका गांधींसारख्या तगड्या आणि प्रभावशाली वक्त्या संसदेत हजर राहिल्या तर भाजपला टक्कर देण्यात त्या यशस्वी होतील, असा युक्तिवाद पक्षाच्या काही नेत्यांनी केला आहे.
10 जूनला होणार निवडणूक
प्रियंका गांधी राज्यसभेवर जाणं म्हणजे गांधी कुटुंबातीलच तीन तीन खासदार संसदेत दिसणं. एकीकडे घराणेशाहीचा आरोप पक्षावर होत असताना प्रियंका गांधी यांना राज्यसभेची बक्षीस दिली जाणार का? याबद्दल सस्पेन्स आहे. राज्यसभेच्या निवडणुका या 10 जूनला होणार आहेत. त्यानिमित्तानं ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. प्रियंका यांना राज्यसभेवर पाठवलं जावं अशी काँग्रेसमधल्या एका गटाची इच्छा आहे. पण त्याबाबत अंतिम निर्णय शेवटी गांधी कुटुंबच घेणार आहे. राज्यसभेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये सातत्यानं प्रियंका गांधींच्या नावाची चर्चा सुरु आहे. पण घराणेशाहीचा आरोप पक्षावर होत असताना एकाच कुटुंबातले तीन तीन लोक खासदार म्हणून दिसणं बरं आहे का? याची काळजी पक्षाला करावी लागणार आहे. पक्षातून काही लोकांची मोर्चेबांधणी सुरु आहे, पण स्वत: गांधी कुटुंब याबाबत फारसं अनुकूल दिसत नाहीय अशी माहितीही मिळत आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत काय आहे काँग्रेसची स्थिती
देशातल्या 57 राज्यसभा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे. त्यापैकी 11 जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येऊ शकणार आहेत. यामध्ये राजस्थानमध्ये तीन, छत्तीसगढमध्ये दोन, महाराष्ट्रात एक, मध्यप्रदेशात एक, कर्नाटकात एक असे खासदार निवडून येऊ शकणार आहेत. प्रियंका गांधींना छत्तीसगढमधून किंवा झारखंडमधून राज्यसभेवर पाठवलं जावं अशी मागणी होत आहे. 2024 च्या निवडणुकीआधी राज्यसभेत प्रियंका गांधी यांचे आक्रमक नेतृत्व प्रस्थापित व्हावं या हेतूनं ही मागणी होत आहे.
एक कुटुंब एक तिकीट या घोषणेचं काय
प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या महासचिव म्हणून 2019 पासून काम करत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यूपीत 400 पैकी अवघ्या 2 जागी विजय मिळाला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या पराभवाची जबाबदारी म्हणून प्रियंका यांच्या महासचिवपदाचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांना राज्यसभेची बक्षीस दिली जाणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. नुकतंच उदयपूर शिबिरात काँग्रेसनं एक कुटुंब एक तिकीट अशी घोषणा केली होती. या घोषणेला एक महिनाही झाला नाही. तोच जर प्रियंका गांधी राज्यसभेवर दिसल्या तर हायकमांडनेच या संकल्पनेला हरताळ फासल्याचं चित्र निर्माण होईल. त्यामुळे चर्चा कितीही असली तरी राज्यसभेसाठी प्रियंका गांधी यांना तूर्तास वाट पाहावी लागू शकते असं चित्र दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या: