मुंबई : 26 जुलै अर्थात आज कारगिल विजय दिवस.18 हजार फूट उंचीवर प्रचंड बर्फाळ प्रदेशात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी कारगिलचं युद्ध जिंकलं. सर्वात जास्त उंचीवर लढलं गेलेलं अत्यंत अवघड युद्ध असंच याचं वर्णन करावं लागेल. आज या विजयाला 19 वर्षे पूर्ण झाली आहेत.

1999 साली पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेचं उल्लंघन करत कारगिल सेक्टरमध्ये घुसलं. पण अत्यंत कठिण परिस्थितीत लढत भारतीय जवानांनी दाखवलेलं शौर्य आजही अंगावर रोमांच उभं करतं. आजपासून 19  वर्षांपूर्वी मे 1999 ते जुलै 1999 या काळात हे कारगिल युद्ध लढलं गेलं. तब्बल तीन महिन्यांच्या प्रयत्नानंतर भारताचं 'ऑपरेशन विजय' यशस्वी झालं.

सर्वात जास्त उंचीवर कारगिलच्या द्रास येथे लढवलं गेलेल हे युद्ध आहे. या युद्धात वेळी जनरल व्ही.पी. सिंग भारतीय सैन्यदलाचे प्रमुख होते. कारगिलच्या युद्धादरम्यान बोफोर्सची भूमिका महत्त्वाची ठरली होती. भारताने या युद्धाची परिस्थिती ज्या संयमाने हाताळली त्याबद्दल भारताचं जगभर कौतुक झालं.

भारत बेसावध असताना पाकिस्तानने अतिशय शिस्तबद्धरीत्या कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेण्यास सुरुवात केली. या घटनेची कोणतीही माहिती भारतीय गुप्तहेर खात्याला मिळाली नव्हती. त्यामुळे जगभरातून भारतीय गुप्तहेर खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले गेले.

सर्वात महत्वाच्या अशा टायगर हिलच्या लढाईत दोन्ही बाजूने जबरदस्त प्रयत्न झाले. या लढाईत पाकिस्तानने भारतीय सैनिकांना चांगलेच झुंजवलं. अखेर 4 जुलै रोजी टायगर हिलवर भारताने ताबा मिळवला. या लढाईत भारताचे 5 सैनिक शहीद झाले.

कारगिल युद्धानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक राजकीय सामाजिक बदल पाहायला मिळाले. पाकिस्तानमध्ये युद्धानंतर लष्कर आणि सरकार यांच्यातील दरी वाढत गेली. शिवाय युद्धानंतर लगेच पाकिस्तानमध्ये लष्करी राजवट लागू करण्यात आली.