नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचं आता नामकरण केलं आहे. भारतात सापडलेला B.1.617.1 हा कोरोना व्हेरिएंट 'कप्पा' आणि B.1.617.2 हा व्हेरिएंट आता 'डेल्टा' या नावाने ओळखला जाणार आहे. हे दोन व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात सापडले होते. त्यानंतर सध्या 40 हून जास्त देशांत त्यांचा प्रसार झाला आहे. काही दिवसांपूर्वी भारत सरकारने या व्हेरिएंटचा उल्लेख इंडियन व्हेरिएंट असा करायला सोशल मीडिया कंपन्यांना बंदी आणली होती. 


ग्रीक अल्फाबेट्सवरुन नामकरण
कप्पा आणि डेल्टा ही दोन नावं ग्रीक अल्फाबेट्सवरुन देण्यात आली आहेत. या आधीच्या अनेक व्हेरिएंटना ग्रीक अल्फाबेट्सची नावं देण्यात आली आहेत. या मालिकेतील पहिला व्हेरिएंट हा ब्रिटनमध्ये सापडला होता, त्याला जागतिक आरोग्य संघटनेने 'अल्फा' असं नाव दिलं आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या व्हेरिएंटला 'बीटा' असं नाव देण्यात आलं तर ब्राझिलमध्ये सापडलेल्या व्हेरिएंटला 'गॅमा' अस नाव देण्यात आलं होतं. 


 






दहा दिवसांपूर्वी केंद्र सरकारने भारतातील कोरोना व्हायरससाठी इंडियन व्हेरिएंट हा शब्द वापरण्यास सोशल मीडिया कंपन्यांना बंदी आणली होती. सोशल मीडिया कंपन्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवरुन इंडियन व्हेरिएंट हा शब्द काढून टाकावा असा आदेश केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिला होता. इंडियन व्हेरिएंट या शब्दाच्या वापरामुळे चुकीची माहिती आणि संदेश जातो, तसेच या शब्दामुळे देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे यापुढे इंडियन व्हेरिएंट या शब्दाचा वापर करु नये असा आदेश माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिला होता. 


आतापर्यंत 44 देशांमध्ये भारतात सापडलेला B.1.617 व्हेरिएंट पसरल्याचं समोर आलं आहे. इतर व्हेरिएंटच्या तुलनेत B.1.617 व्हेरिएंटचा प्रसार हा सुलभ आणि अत्यंत वेगाने होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं आहे. तसेच या B.1.617 व्हेरिएंटमुळे मृतांच्या संख्येतही वाढ होत असल्याचं सांगितलं होतं. 


महत्वाच्या बातम्या :