नवी दिल्ली : इंडियन फार्मर्स फर्टिलायजर कोऑपरेटिव्ह लिमिटेडने (IFFCO) जगात पहिल्यांदाच नॅनो युरिया लिक्विड तयार केलं आहे. यामुळे पिकांचं उत्पादन वाढून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल. आता एक गोणी युरिया खताच्या ऐवजी अर्धा लिटर नॅनो युरिया लिक्विड पुरेसं ठरणार आहे.
इफ्कोची ऑनलाईन-ऑफलाईन झालेल्या 50व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत ही घोषणा करण्यात आली. जमिनीत युरियाचा वापर कमी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाने प्रेरित होत हे लिक्विड तयार करण्यात आलं आहे.
नॅनो युरियाचा अर्थ काय?
कमी प्रमाण/आकार आणि मोठी क्षमता या दृष्टीने हे नॅनो युरिया लिक्विड तयार करण्यात आलं आहे. इफ्कोने बनवलेल्या नॅनो युरिया लिक्विडची 500 मिलीची एक बाटली सामान्य युरियाच्या एका गोणीच्या बरोबरीची आहे. याच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल. नॅनो युरिया लिक्विडचा आकार लहान असल्याने ते खिशातही मावू शकतं, जेणेकरुन ने-आण करणं सोपं होईल.
पिकांचं उत्पादन वाढतं
इफ्कोचा दावा आहे की, नॅनो युरिया लिक्विड रोपांच्या पोषणासाठी प्रभावी आणि परिणामकारक आहे. याच्या वापरामुळे पिकांचं उत्पादन वाढतं तसंच पोषक तत्वांच्या गुणवत्तेत सुधारणा होते. नॅनो युरिया लिक्विडमुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीची गुणवत्ता सुधारणा तसंच जलवायू परिवर्तन आणि टिकाऊ उत्पादनावर सकारात्मक परिणाम करुन ग्लोबल वार्मिंग कमी करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतं.
कसं वाढणार शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार?
इफ्कोचा दावा आहे की नॅनो युरिया लिक्विड शेतकऱ्यांसाठी स्वस्त आहे आणि उत्पादन क्षमता वाढते. अशाप्रकारे शेतकऱ्यांचा खर्चही कमी होणार आहे, तर उत्पादन वाढल्याने कमाई जास्त होणार आहे.
किती उत्पादन वाढेल?
इफ्कोनुसार, यासाठी संपूर्ण देशातील 94 पेक्षा जास्त पिकांवर सुमारे 11 हजार कृषी क्षेत्र परीक्षण (एफएफटी) करण्यात आले होते. यामुळे पिकांच्या उत्पादनात सरासरी 8 टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. इफकोच्या वैज्ञानिक आणि अभियंत्यांनी नॅनो युरिया लिक्विड हे कलोलमधील नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये तयार केलं आहे.
इफ्को नॅनो युरिया लिक्विड हे सामान्य युरिया खताचा वापर 50 टक्क्याने कमी करण्याच्या उद्देशाने कमी करण्यात आला आहे. याच्या 500 मिलीच्या एका बाटलीत 40,000 पीपीएम नायट्रोजन असतो, ज्यामधून सामान्य युरिया खताच्या गोणीएवढं नायट्रोजन पोषक तत्व मिळतं.
गोणीमधल्या युरियापेक्षा लिक्विड युरियाची किंमत कमी
इफ्को नॅनो युरियाचं उत्पादनाला जून महिन्यातच सुरुवात होणार असून लवकरच याची विक्रीही केली जाईल. इफकोने शेतकऱ्यांसाठी 500 मिली नॅनो युरियाच्या एका बाटलीची किंमत 240 रुपये निर्धारित केली आहे, जी सामान्य युरिया खताच्या गोणीच्या किमतीपेक्षा 10 टक्क्यांनी कमी आहे.
भारतात दरवर्षी सुमारे 350 लाख टन युरियाचा वापर केला जातो. नॅनो युरियामुळे खताचा वापर निम्म्याने कमी होईल. अनुदानावर वार्षिक 600 कोटी रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. यामुळे भारताची युरिया आयात करण्याची गरजही कमी होईल.