नवी दिल्ली: नोटाबंदीच्या काळात एकूण १६ हजार ४०० कोटींची अघोषित संपत्ती सरकारकडे जाहीर केल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. नोटाबंदीदरम्यान झालेल्या परिणामांबाबत केंद्र सरकारनं आज पुन्हा एक आकडेवारी जाहीर केली. तसंच नोटाबंदीमुळे सरकारसाठी नव्या करदातांची संख्या ही तब्बल ९१ लाखांना वाढल्याचा दावाही जेटलींनी केला.

महत्वाचं म्हणजे पहिल्या फेजमध्ये देशभरातल्या १८ लाख लोकांकडे काळा पैसा आढळून आल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. आज दिल्लीत जेटलींनी ऑपरेशन क्लीनमनी पोर्टलचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

'8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी करण्यात आली. यामुळे डिजिटल व्यवहारांना बरीच चालना मिळाली.' असंही जेटली म्हणाले.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी यावेळी स्पष्ट केलं की, नोटाबंदीनंतर आयकर रिटर्नच्या ई-फायलिंगमध्ये 22 टक्के वाढ झाली आहे.

नोटबंदीनंतर सरकारनं जाहीर केली महत्वाची आकडेवारी:

* १६ हजार ४०० कोटींची अघोषित संपत्ती सरकारकडे जाहीर

* ही ऑपरेशन क्लीन मनीच्या पहिल्या फेजची आकडेवारी आहे. ज्यात १८ लाख लोक सापडले.

* सरकारसाठी नव्या करदात्यांची संख्या ९१ लाखांनी वाढली.