नवी दिल्ली: नागरिकांच्या हक्कांच्या विरोधात काम करणारं सरकार सत्तेत असल्याचा आरोप करत अन्यायाविरोधात लढण्यासाठी 'इन्साफ' (Insaaf) या नव्या व्यासपीठाची घोषणा करत असल्याचं राज्यसभा खासदार कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी जाहीर केलं. गैरभाजप मुख्यमंत्र्यांनी आणि नेत्यांनी या उपक्रमात सामील होण्याचं आवाहन त्यांनी केलं. येत्या 11 मार्च रोजी दिल्लीतील जंतरमंतर या ठिकाणी आपण एक बैठक बोलवली असून त्यामध्ये  भारतासाठी एक नवीन दृष्टीकोन मांडणार आहे असं ते म्हणाले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करणार नाही, त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करणार असंही ते म्हणाले. 


भारतात सर्वत्र अन्याय पसरला आहे, असा दावा सिब्बल यांनी केला. नागरिक, संस्था, पत्रकार, शिक्षक आणि मध्यम आणि लघु व्यावसायिकांवर अन्याय होत असल्याचा दावा त्यांनी केला. खासदार सिब्बल म्हणाले की, "लोकांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मदत करण्यासाठी 'इन्साफ' आणि 'इन्साफ के सिपाही' (Insaaf ke sipahi) नावाची वेबसाइट सुरू करत आहोत आणि या उपक्रमात वकील प्रमुख भूमिका बजावतील." 


कपिल सिब्बल म्हणाले की, "लोकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे आणि त्यांनी इन्साफ के सिपाही बनण्याची गरज आहे. जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांनी लढा दिला पाहिजे. या उपक्रमात सर्व गैरभाजप मुख्यमंत्र्यांनी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मला सहकार्य करावे, अशी माझी इच्छा आहे. गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी राष्ट्रीय चळवळ सुरू करू."


अन्यायाविरोधात सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न 


देशातील अन्यायाविरुद्ध एकत्रितपणे लढा देण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते आणि पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असं खासदार कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केलं. आपलं उद्दिष्ट राजकीय नसून संवैधानिक मूल्यांसाठी लढणे आहे असं ते म्हणाले. 


विरोधकांचा महत्त्वाचा आवाज मानल्या जाणाऱ्या राज्यसभेचे अपक्ष खासदार सिब्बल यांनी इन्साफच्या माध्यमातून विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस सध्या एकमेकांवर टीका करताना दिसत असून कपिल सिब्बल सर्व विरोधकांना एकत्र कसं आणणार हे पाहावं लागेल. 


एका प्रश्नाला उत्तर देताना कपिल सिब्बल म्हणाले की, "काँग्रेसनेही या उपक्रमात सहभागी व्हावे अशी माझी इच्छा आहे. जनआंदोलन निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश असून आपण कोणताही राजकीय पक्ष स्थापन करणार नाही. या उपक्रमातून सामान्य माणूस आणि वकील एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध लढा देणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा देखील प्रत्येक क्षेत्रात आपली विचारधारा पसरवत आहेत, ज्यामुळे काही बाबतीत अन्यायालाही चालना मिळते. त्या अन्यायाविरुद्धही आम्ही लढू."


ईडीच्या माध्यमातून राजकीय विरोधकांना संपवण्याचे प्रयत्न सुरू


कपिल सिब्बल यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर कठोर हल्ला चढवला आणि आरोप केला की ते राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या माध्यमातून काम करत आहे. देशातील 100 लोकांकडे 54 लाख कोटी रुपयांची संपत्ती एकवटली आहे, हा आर्थिक न्याय आहे का, असा सवाल त्यांनी केला. ईडीने अलीकडच्या काळात 121 लोकांवर कारवाई केली आहे, त्यापैकी 115 विरोधी पक्षांचे आहेत असं ते म्हणाले.