नवी दिल्ली : भारताला 1983 मध्ये पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकूण देणारे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. कपिल देव यांना राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध फोर्टिस रुग्णालयात रात्री 1 वाजता दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर डॉ. अतुल माथुर यांनी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली आहे. कपिल देव सध्या 61 वर्षांचे आहेत.


एबीपी न्यूजने कपिल देव यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांशी संवाद साधला आहे. त्यांनी सांगितले आहे की आता कपिल देव यांची प्रकृती स्थिर असून त्याच्यावरील धोका टळला आहे. कपिल देव हे एबीपी न्यूजचे मुख्य क्रिकेट तज्ज्ञही आहेत.


कपिल देव यांच्या क्रिकेट कारकीर्दीवर एक नजर


फलंदाजी -
कपिल देव यांनी 131 कसोटीत आठ शतके आणि 27 अर्धशतकांच्या मदतीने 5248 धावा केल्या आहेत. कसोटी सामन्यात त्यांची सर्वाधिक धावसंख्या 163 राहिली आहे. त्याचबरोबर कपिल देव यांनी 225 एकदिवसीय सामन्यात एक शतक आणि 14 अर्धशतकांच्या मदतीने 3783 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वाधिक धावसंख्या 175 आहे.


IPL 2020 : राजस्थान प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा मंदावल्या; पॉईंट टेबलची स्थिती काय?


गोलंदाजी


कपिल देव यांनी 131 कसोटीत 434 बळी घेतले आहेत. कपिल यांनी पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबर 1978 रोजी खेळला होता. त्यांनी 225 एकदिवसीय सामन्यात 253 बळी घेतले आहेत. तर 1 ऑक्टोबर 1978 मध्ये कपिल यांनी पाकिस्तानविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता.


कपिल देव यांच्या आयुष्यावर चित्रपट निर्मिती


अष्टपैलू खेळाडू कपिल देवच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदाच 1983 साली क्रिकेट विश्वचषक जिंकला. वर्ल्ड कपच्या या सुवर्ण मुहूर्तावर बॉलिवूडमधील एक चित्रपटही तयार केला जात आहे, ज्याला '83' नाव देण्यात आले आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह कपिल देवची भूमिका साकारत आहे. तर रणवीर सिंगची खरी पत्नी दीपिका पादुकोण कपिल देवची पत्नी रोमी देवीची भूमिका साकारत आहे.