नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये विचित्र घटना घडली आहे. येथील घाटमपूर ठाणे हद्दीतील खिवरा गावात चक्क एका बकरीने चारजणांचा बळी घेतला आहे.
अधिक माहितीनुसार, खिवरा गांवातील एक बकरी विहरीत पडली होती. या बकरीला वाचवण्यासाठी गेलेल्या किशोर नावाच्या तरुणाने विहरीत उडी घेतली. पण त्या विहरीत पाणी कमी असल्याने विषारी वायू तयार झाला होता. याने त्याचा मृत्यू झाला.
हे पाहून एका मुलाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी त्या विहरीजवळ गर्दी केली. यातील काहींनी त्याला बाहेर काढण्यासाठी विहरीत प्रवेश केला. मात्र, विहरीतील विषारी वायूची माहिती नसल्याने त्यांचाही मृत्यू झाला.
याची माहिती मिळताच मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी मोठ्या कष्टाने हे सर्व मृतदेह बाहेर काढले. स्थानिक पोलिसांनी त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन, शवविच्छेदनासाठी पाठवले. मात्र, या घटनेनंतर ग्रामस्थांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.