Kanchenjunga Express Accident : पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी इथं कंचनजंगा एक्स्प्रेस (West Bengal Kanchenjunga Express train accident ) आणि मालगाडीची भीषण धडक झाली. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झालाय तर 60 जण जखमी झाले आहेत.  त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या अपघाताची माहिती मिळताच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घडनास्थळावर जात पाहणी केली.


सियालवाहकडे जाताना कंचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला. मालगाडीला धडकल्यानंतर रेल्वेचे काही डब्बे रुळावरुन घसरले होते.  ही धडक इतकी भीषण होती की कंचनजंगा एक्स्प्रेसचे अनेक डब्बेल ट्रॅकवरुन खाली घसरले. आज सकाळी 9.30 च्या सुमारास ही दुर्घटना झाली. कंचनजंगा एक्स्प्रेस मालगाडीला जाऊन धडकली. 


रेल्वेमंत्री घटनास्थळी पोहचले - 


रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी तातडीने पश्चिम बंगाल जलपाईगुडी स्टेशनजवळ रंगापानी येथे घटनास्थळावर भेट देत पाहणी केली. मोठी वाहने जाण्यासाठी रस्ता अरुंद असल्याने अपघातस्थळी जाण्यासाठी रेल्वेमंत्र्यांना मोटारसायकलने जावं लागले.  ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी रंगपानी स्टेशनजवळ एका मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून धडक दिली. त्यामुळे काही जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.   






सरकारकडून मदत जाहीर -


पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली. ते म्हणाले की, अपघातातील मृतांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये मृतांच्या नातेवाईकांना 10-10 लाख रुपये देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमींना 2.5-2.5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50-50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.






पंतप्रधान कार्यालयाकडून सोशल मीडियावर पोस्ट करत मदतीची घोषणा केली आहे. “पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातातील प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.तसेच अपघातातील जखमींना 50,000 रुपये दिले जातील.”


पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख


पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. या अपघातातल्या मृतांच्या  कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीकडून 2 लाख रुपयांचे आणि जखमींना 50,000 रुपयांचे सहाय्य  पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले आहे.


“पश्चिम बंगालमधील झालेला रेल्वे अपघात फारच दुःखद आहे. आपले प्रियजन गमावलेल्या लोकांप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो. अधिकाऱ्यांशी बोलून तेथील परिस्थिती जाणून घेतली. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी बचावकार्य सुरू आहे आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी निघाले आहेत.”