मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या ज्वेलरी कंपन्यांपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडने विनोद राय यांची कंपनीचे अध्यक्ष आणि स्वतंत्र गैर-कार्यकारी संचालक म्हणून नियुक्तीसाठी मंडळाची मान्यता जाहीर केली आहे. तथापि, त्यांच्या नियुक्तीसाठी भागधारकांची आणि प्राधिकरणाची परवानगी घेणं बाकी आहे. टीएस कल्याणरामन हे कल्याण ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कायम राहतील. 


विनोद राय हे भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) होते आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या बाह्य लेखापरीक्षकांच्या पॅनेलचे माजी अध्यक्ष होते. विनोद राय यांनी कॅगच्या कार्यकाळात 2G घोटाळा आणि कोळसा घोटाळ्याचा अहवाल सादर केला होता. या अहवालात मनमोहन सिंह यांच्यापासून ते काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते, पण एकही आरोप सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे विनोद राय यांनी कोणत्या आधारावर एवढे गंभीर आरोप केले, यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आता त्याच विनोद राय यांची कल्याण ज्वेलर्सच्या संचालकपदी नियुक्ती करण्याची घोषणा झाली आहे. 


सरकारमध्ये अनेक पदांवर काम, पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी
विनोद राय हे माजी कॅगच आहेतच, पण त्यांनी भारत सरकारमध्येही अनेक पदं भूषवली आहेत. राज्य सरकारांमध्येही त्यांनी पदभार सांभाळला आहे. त्यांनी भारतात अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत. भारत सरकारने सार्वजनिक बँकिंगमधील सुधारणांसाठी बँक बोर्ड ब्युरोची स्थापना केली होती, ज्याचे अध्यक्ष विनोद राय होते. विनोद राय हे पद्मभूषण पुरस्कर विजेते देखील आहेत, जो भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.


2G आणि कोळसा घोटाळ्यामुळे प्रकाशझोतात
2G आणि कोळसा घोटाळ्याच्या अहवालानंतरच विनोद राय पहिल्यांदा प्रकाशझोतात आले होते. अहवालात त्यांनी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते, मात्र नंतर त्यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी लागली होती. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावाही केला होता, त्यानंतर विनोद राय यांनी त्यांची बिनशर्त माफी मागितली होती. त्याचबरोबर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे कोळसा घोटाळ्याला जबाबदार नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे विनोद राय यांच्यावर उपस्थित करण्यात होते की खरोखरच घोटाळा झाला होता का? की हे आरोप कोणत्या षडयंत्राखाली करण्यात आले, असा प्रश्नही उपस्थित झाला होता.