Kalpana Chawla : आज 1 फेब्रुवारी, 19 वर्षांपूर्वी याच दिवशी एक अंतराळ दुर्घटना घडली होती, ज्याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला. 1 फेब्रुवारी 2003 रोजी, अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’चे (NASA) स्पेस शटल पृथ्वीवर परतत असताना त्याला अपघात झाला, ज्यामध्ये सात अंतराळवीर ठार झाले. या अपघातात भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला (Kalpana Chawla) यांचाही समावेश होता. कल्पना चावला भारतासह जगभरातील मुली आणि महिलांसाठी आयकॉन बनल्या. या दुर्घटनेने नासाला त्यांची कार्यपद्धती बदलण्यास भाग पाडले होते.


थेट ‘नासा’त झेप!


या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अंतराळवीरांमध्ये कल्पना चावला देखील होत्या. भारतीय वंशाच्या कल्पना यांचा जन्म 17 मार्च 1962 रोजी हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण टागोर बाल निकेतनमध्ये केले. यानंतर, त्यांनी चंदीगड येथून एरोनॉटिकल इंजिनीअरिंग पूर्ण केले आणि 1984मध्ये अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले. मार्च 1995 मध्ये त्यांना NASA अंतराळवीरांच्या संघात सामील करण्यात आले आणि 1997मध्ये त्यांची पहिल्या अंतराळ उड्डाणासाठी निवड झाली.


दुसरा अंतराळ प्रवास ठरला अखेरचा..


कोलंबिया उड्डाण ही कल्पना चावलांची पहिली अंतराळ यात्रा नव्हती. यापूर्वी 1997 मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या प्रवासादरम्यान 372 तास अंतराळात घालवले होते. 16 जानेवारी 2003 रोजी त्यांचा दुसरा अंतराळ प्रवास सुरू झाला होता. परंतु, 1 फेब्रुवारी 2003 रोजी हे अंतराळ यान पृथ्वीवर परत येत असताना अचानक खराब झाले. या अपघातात कल्पना चावलासह अन्य सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला.


या अपघाताने कल्पना चावला प्रसिद्धीच्या झोतात आल्या. भारत, अमेरिकेसह जगभरातील मुलींसाठी त्या प्रेरणास्त्रोत बनल्या. त्यांची लोकप्रियता पाहता नासाने त्यांच्या एका सुपर कॉम्प्युटरचे नाव ‘कल्पना चावला’ ठेवले.


‘नासा’ला बाळवे लागले नियम  


या अपघाताचा सर्वाधिक फटका नासाला बसला होता. 1986 मध्ये ‘चॅलेंजर’नंतर अमेरिकेचा हा दुसरा स्पेस शटल अपघात होता. यानंतर अमेरिकेतून अंतराळवीरांना अंतराळात पाठवणे बंद करण्यात आले. दोन वर्षांहून अधिक काळ, कोलंबिया दुर्घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतेही अंतराळयान उड्डाण केले गेले नाही. अखेर, नासालाही आपल्या सुरक्षा नियमांत बरेच बदल करावे लागले होते.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha