नवी दिल्ली: कल्पना चावलाचा जन्म 17 मार्च 1962 रोजी हरियाणामधील कर्नालमध्ये झाला. कल्पनाने जगभरात देशाचे नाव रोशन केले. कल्पनाचा आज वाढदिवस आहे. परंतु तिच्या
जन्म तारखेचा एक किस्सा आहे. कल्पनाचा जन्म 17 मार्च 1962 रोजी झालेला असला तरी कागदोपत्री 1 जुलै 1961 ही तारीख आहे. यामागचं कारण म्हणजे शाळेत तिच्या दाखल्यासाठी अडचण आली होती. कल्पनाचा जन्म हरियाणामधील कर्नाळमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसी लाल चावला होते, तर आईचे नाव संजयोती होते. कल्पना ही घरातील सर्वात छोटी सदस्य असूनही तिचे कर्तृत्व एवढे मोठे आहे की, आज भारतच नाही तर संपूर्ण जग आठवण काढत आहे
लहानपणी विचारायची प्रश्न
कल्पनाचे प्राथमिक शिक्षण कर्नालमधील बाल निकेतन शाळेत झाले. थोडी मोठी झाल्यावर तिने तिच्या वडिलांना सांगितले की, तिला इंजिनीअर बनण्याची इच्छा आहे. अवकाशयान काय असतं, आकाशात कसे उडतात, मी आकाशात उडू शकते का? असे प्रश्न कल्पना लहानपणीच तिच्या वडिलांना विचारायची. छोट्या कल्पनाला उंच भरारी घ्यायची होती. कधी कधी तर तिने विचारलेले प्रश्न घरचे हसून सोडून द्यायचे.
एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये घेतली मास्टरची पदवी
कल्पना स्वप्न साकार करण्यासाठी 1982 मध्ये अमेरिकेत गेली. तिथे तिने यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्ससमधून एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये मास्टरची पदवी घेतली. अंतराळात गेलेली कल्पना ही भारतातील पहिली महिला आहे. 1 फेब्रुवारी 2003 रोजी अंतराळात 16 दिवस राहून कल्पना तिच्या इतर सहा सहकाऱ्यांसोबत परतीचा प्रवास करत होती तेव्हा यान जमिनीवर आदळले. या दुर्घटनेत कल्पनासह तिच्या सर्व सहकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर फ्लोरिडामधील अंतरिक्ष स्पेस स्टेशनवरचा झेंडा अर्ध्यावर घेण्यात आला होता. कल्पना आजही सर्वांच्या हृद्यात जिवंत आहे.