नवी दिल्ली: न्यूज टेलीव्हिजनच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ आणि भव्य शो 'भारतवर्ष'वर लवकरच एक पुस्तक येणार आहे. 5000 वर्ष जुना इतिहास आता लवकरच पुस्तकाच्या रुपात येणार असून जगरनॉट बुक्स याचं प्रकाशन करणार आहे.


एबीपी न्यूजवरील लोकप्रिय शो 'भारतवर्ष'चे निवेदक सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर हे होते. हे पुस्तक दोन भाषांमध्ये प्रकाशित केलं जाणार आहे. या पुस्तकाचं हिंदी नाव  ‘अनुपम खेर प्रस्तुत करते हैं- भारतवर्ष’ आणि इंग्रजी नाव ‘Bharatvarsha–Presented by AnupamKher’ असणार आहे. हे पुस्तक 2017 सालच्या पहिल्या तीन महिन्यात प्रकाशित केलं जाईल.

एबीपी न्यूज नेटवर्कचे सीईओ अशोक वेकंटरमणी यांनी याबाबत सांगितलं की, 'एबीपी न्यूज जगरनॉट बुक्सच्या साथीनं 'भारतवर्ष' सीरीज प्रिंट आणि डिजिटल स्वरुपात घेऊन येणार आहे. या शोसाठी करण्यात आलेलं व्यापक संशोधन हे वाचकांसाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरेल.'

जगरनॉट बुक्सच्या संपादक रेणू आगाल म्हणाल्या की, 'एबीपी न्यूजसोबत काम करणं ही फारच रोमांचक गोष्ट आहे. भारतातील प्रभावशाली व्यक्तींच्या कथा जगरनॉट आता अॅप आणि प्रिंटच्या स्वरुपात घेऊन येणार असून आम्हाला त्याबाबत बऱ्याच अपेक्षा आहेत. भारताच्या जडघडणीत ऐतिहासिक कामगिरी बजावणाऱ्या या महान व्यक्तींच्या कथा वाचकांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करतील.  तसंच एबीपीसोबत भविष्यातही अशाच प्रकारचं काम करायला मिळेल अशी मला आशा आहे.'

या पुस्तकाबाबत बोलताना एबीपी न्यूजचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांनी सांगितलं की, 'आम्ही न्यूज टीव्ही इंडस्ट्रीतील वैचारिक दिशादर्शक आहोत आणि 'भारतवर्ष' या शोच्या लोकप्रियतेनं ते पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. आम्ही आधी देखील 'प्रधानमंत्री', 'रामराज्य' यासारखे हटके शो केले, पण पहिल्यांदाच कोणतातरी शो हा पुस्तक स्वरुपात प्रकाशित होत आहे. आमचा हा शो जगरनॉट बुक्स प्रिंट आणि डिजिटल रुपात घेऊन येणार असून याचा मला फार आनंद वाटतो.'

एबीपी न्यूजवरील 'भारतवर्ष' हा भारताला महान बनविण्याची कहाणी आहे. भारताच्या जडणघडणीतील ही गौरवगाथा आहे. जर हे महानायक नसते तर भारतात काय झालं असतं? हे या कार्यक्रमामध्ये दाखविण्यात आलं आहे. प्रत्येक टप्प्यात एक असा महान पुरुष आला की, ज्यानं भारताच्या बदलत्या रुपाला एक नवी दिशा दिली. याच महान व्यक्तींनी सांस्कृतिक, संविधानिक, धर्मनिरपेक्ष 'भारतवर्ष' घडवला. याच महापुरुषांची कहाणी 'भारतवर्ष'मध्ये दाखविण्यात आली असून आता लवकरच हे पुस्तक रुपातही येणार आहे.

या शोसाठी एबीपी न्यूजच्या टीमनं या महापुरुषांच्या आयुष्याशी निगडीत माहिती मिळविण्यासाठी बरंच संशोधन केलं. यामध्ये गौतम बुद्ध, चाणक्य, अशोक सम्राट, आदी शंकराचार्य, पृथ्वीराज चौहान, कबीर, अकबर, महाराणा प्रताप, दारा शुकोह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा समावेश आहे.