Joe Biden G20 Summit: आज राजधानी दिल्लीत (Delhi News) जगभरातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी असणार आहे. जी20 साठी (G20 Summit) जगभरातील अनेक देशांचे राष्ट्रपती अन् राष्ट्राध्यक्ष दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. अशातच जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) जी20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाले आहेत. बायडन यांच्या स्वागताची जबाबदारी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांच्याकडे सोपवण्यात आली होती. जो बायडन दिल्लीत दाखल होताच व्ही. के. सिंह यांनी त्यांचं स्वागत केलं. पण त्यासोबतच एक चिमुकलीही जो बायडन यांच्या स्वागतासाठी उपस्थित होती. सध्या सोशल मीडियावर या चिमुकलीचे फोटो व्हायरल होत आहेत. तसेच, बायडन यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेली ती चिमुकली नेमकी कोण? ती स्वागतासाठी कशी उपस्थित होती? असे अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही चिमुकली अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांची मुलगी आहे. तिचं नाव माया असून ती 12 वर्षांची आहे. तिच्यासोबत तिचे वडिल आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटीदेखील उपस्थित आहेत. दरम्यान, ही चिमुकली चर्चेचा विषय ठरण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, जेव्हा गार्सेटी यांनी भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांची मुलगी माया हिचा एक फोटोही व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये माया हिब्रू बायबल हातात धरून उभी होती. गार्सेटी यांनी हेच बायबलवर हातात घेत शपथ घेतली होती.
कोणताही महत्त्वाचा इव्हेंट असो एरिक गार्सेटी यांच्यासोबत त्यांची मुलगी माया नेहमीच असते. माया जुआनिता गार्सेटी ही भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी आणि त्यांची पत्नी एमी वीकलँड यांची एकुलती एक मुलगी आहे. याआधी जेव्हा जेव्हा एरिक अमेरिकेत निवडणूक रॅलीत किंवा मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले आहेत. माया नेहमीच त्यांच्यासोबत दिसली आहे. अनेकदा या बापलेकीच्या जोडीचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत.
एरिक गार्सेटी कोण आहे?
एरिक गार्सेटी हे अमेरिकेचे भारतातील राजदूत आहेत. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. ते ऑक्सफर्ड विद्यापीठात रोड्स स्कॉलर होते आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही त्यांनी शिक्षण घेतलं होतं. त्यांनी युनायटेड स्टेट्स नेव्ही रिझर्व्हमध्ये अधिकारी म्हणूनही काम केलं आहे. गार्सेटी यांनी जुलै 2013 ते डिसेंबर 2022 या काळात लॉस एंजेलिसचे महापौरपदही भूषवलं आहे. लॉस एंजेलिसचे पहिले ज्यू महापौर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.
दरम्यान, एरिक गार्सेटी हे जो बायडन यांचे निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जातंय, त्यामुळेच त्यांना भारतात राजदूत म्हणून पाठवण्यात आल्याच्याही चर्चा अनेकदा रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. व्हाईट हाऊसनं दिलेल्या वृत्तानुसार, जो बायडन भारतात पोहोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. G-20 शिखर परिषदेदरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे लक्ष विकसनशील देशांना आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यावर असेल. यासोबतच ते हवामानापासून ते आयटीपर्यंत अमेरिकन लोकांच्या प्राधान्यक्रमांवरही आपलं लक्ष ठेवतील.