Job Crisis in India : कोरोना महामारीचा कहर नागरिकांच्या पोटापाण्यावर अधिकच परिणाम करत आहे. या महामारीमुळे मे महिन्यात सुमारे दीड कोटी भारतीयांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. मागील एक वर्षापासून देशात आर्थिक सुधारणांवर विराम लागला आहे. सध्या बेरोजगारीच्या आकडेवारीत यापुढेही कोणतीही सुधारणा दिसण्याची शक्यता दिसत नाही. जुलै 2020 पासून ग्राहकांची खरेदीची क्षमता कमी झाली आहे आणि अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाही. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (CMIE) अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे.
संधी कमी असल्याने नोकरी मिळण्यास अडचणी
CMIE च्या अहवालानुसार, यंदा एप्रिल महिन्यात 39.7 कोटी लोकांकडे रोजगार होते, पण मे महिन्यात या संख्येत घट होऊन 37.5 कोटीपर्यंत आली आहे. अहवालानुसार एप्रिल आणि मे दरम्यान जेव्हा कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर असताना नोकऱ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात कपात सुरु होती. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू केल्यानंतर नोकरकपातीला आणखी वेग आला. एप्रिल आणि मे महिन्यात पगारी आणि बिनपगारी नोकऱ्यांमध्ये 2.3 कोटींची घसरण झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे की, कोट्यवधी बेरोजगारांपैरी 5.07 कोटी जण सक्रियरित्या रोजगाराच्या शोधात आहेत. परंतु संधी कमी असल्याने त्यांना नोकरी मिळत नाही.
मे महिन्यात 12 टक्के बेरोजगारी दर
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या अभ्यासानुसार, बेरोजगारीचा दर मे महिन्यात 12 टक्के होता, तर एप्रिलमध्ये 8 टक्के होता. रोजगार जाण्याचं मुख्य कारण कोविड-19 संसर्गाची दुसरी लाट हे आहे. ज्यांची नोकरी गेली, त्यांना नवी नोकरी शोधण्यात अडचणी येत आहेत. असंघटित क्षेत्रात रोजगार वेगाने निर्माण होतात, पण संघटित क्षेत्रात चांगल्या नोकऱ्या येण्यासाठी काही काळ लागतो, असं CMIE च्या अहवालात म्हटलं आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी मे महिन्यात कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लावलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे बेरोजगारीचा दर 23.5 टक्क्याच्या विक्रमी स्तरावर पोहोचला होता. अनेक तज्ज्ञांचं मत आहे की, संसर्गाची दुसरी लाट पिकवर पोहोचली आहे आणि राज्ये आता हळूहळू निर्बंधांमध्ये शिथिलता देत आर्थिक हालचालींनाही परवानगी देतील.
97 टक्के कुटुंबांचं उत्पन्न कमी
CMIE ने एप्रिल 1.75 लाख कुटुंबियांचा देशव्यापी सर्व्हेचं काम पूर्ण केलं. याआधी गेल्या एका वर्षाभरात उत्पन्नासंदर्भात चिंताजनक परिस्थिती समोर आली आहे. सर्व्हेमध्ये सामील कुटुंबापैकी केवळ तीन टक्के जणांनी उत्पन्न वाढल्याचं सांगितलं. तर 55 टक्के जणांनी सांगितलं की, त्यांचं उत्पन्न कमी झालं आहे. सर्व्हेमध्ये 42 टक्के जणांनी सांगितलं की, त्यांचं उत्पन्न मागील वर्षाएवढंच आहे. ते म्हणाले की, "जर महागाईचा दर समायोजित केला तर आमच्या अंदाजानुसार देशातील 97 टक्के कुटुंबाचं उत्पन्न महामारीच्या काळात कमी झालं आहे."