Covid-19: देशात एकिकडे कोरोना रुग्णसंख्येच्या आकड्याची भीती आरोग्य मंत्रालयाला असतानाच अनेक राज्यांकडून लसींच्या तुटवड्याचाही सूर आळवण्यात येत आहे. पण, केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मात्र देशातील परिस्थिती काही प्रमाणात वेगळी आहे. 


मंगळवारी केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी घट झाली आहे. इतकंच नव्हे तर मागील आठवड्याभरात 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमीच होत आहे असंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी देशातील कोरोना संसर्गादरम्यान ही सकारात्मक बातमी माध्यमांना दिली. 'सक्रिय रुग्णसंख्या 50 टक्क्यांनी घटली आहे. दर दिवशी रुग्णसंख्येत 1.3 लाखांची घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मागील आठवड्याभरापासून रुग्णसंख्या सातत्यानं घटत आहे आणि ही अतिशय सकारात्मक बाब आहे', असं ते म्हणाले. 


Coronavirus : कोरोनामुक्त झाल्यानंतर 2 ते 6 आठवडे काळजी घेणं गरजेचं; लहान मुलांमध्ये पुन्हा आढळतायत काही लक्षणं


ही माहिती देत असतानाच त्यांनी देशातील एका दिवसात आढळणारी रुग्णसंख्या ही 1,27,000 वर आल्याची बाब अधोरेखित केली. 28 मे या दिवसापासून देशात 2 लाखांहून कमी कोरोनाबाधित आढळत आहेत. त्यामुळं संसर्गाचा वेग मंदावल्याचं लक्षात आल्याचा मुद्दा त्यांनी प्रकाशझोतात आणला. 


देशाचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे आता 92 टक्क्यांवर पोहोचलं असून, दर आठवडयाला तब्बल 20 लाख कोरोना चाचण्या होत असल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. 


देशात लसींचा तुटवडा नाही 
आयसीएमआरचे मुख्य संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी स्पष्ट केल्यानुसार सध्याच्या घडीला देशात लसींचा तुटवडा नाही. जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा ऑगस्ट महिन्यापर्यंत 1 कोटी नागरिकांना दर दिवशी लस देण्याइतका साठा देशात आहे आणि डिसेंबर महिन्यापर्यंत देशातील सर्व नागरिकांना लस दिलेली असेल असं वक्तव्य त्यांनी आत्मविश्वासानं केलं. 


लसींच्या पुरवठ्याबाबत आणि लसीकरणाच्या प्रक्रियेबाबत केंद्रानं केलेलं हे वक्तव्य पाहता देशात खरंच डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.