मुंबई : कोरोना काळात मंदीत गेलेली देशाची अर्थव्यवस्था आता पुन्हा सावरत असल्याचं चित्र आहे. उद्योग आणि सेवा क्षेत्रही आता पुन्हा उभारी घेत असून या क्षेत्रात आता नव्याने नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आयटी क्षेत्रातील देशातील दुसरी मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिस (Infosys)या वर्षी बंपर नोकर भरती करणार असून त्या माध्यमातून एकूण 45 हजार फ्रेशर्सना रोजगार मिळणार आहेत. तशी घोषणा इन्फोसिसने बुधवारी केली. 


इन्फोसिसकडून ही घोषणा अशा वेळी करण्यात येत आहे ज्यावेळी या कंपनीचे अनेक कर्मचारी नोकरी सोडून जात आहेत. सध्याच्या काळात अनेक आयटी कंपन्यामध्ये कौशल्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा धडाका सुरु आहे. त्यातच इन्फोसिसने ही मोठी घोषणा केली. 


इन्फोसिस कंपनीला यंदाच्या तिमाहीत चांगला फायदा झाल्याचं दिसून आलंय. सप्टेंबर 2021 पर्यंत इन्फोसिसच्या फायद्यात वाढ होऊन ती 29,602 कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. या आधी जूनच्या तिमाहीत ही रक्कम 27,896 कोटी इतकी झाली आहे. 


गेल्या काही काळात इन्फोसिसला सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या तिमाहीत हे प्रमाण 13.9 टक्के होतं. आता त्यात वाढ झाली असून ती 20.1 टक्क्यावर पोहचली आहे. अशातच आता इन्फोसिसने नव्या 45 हजार भरतीची घोषणा केली आहे. 


कोरोनामुळे सगळीकडे 'वर्क फ्रॉम होम'चा ट्रेंड वाढला आहे. याचा फायदा कंपन्यांना झाला असून त्यांची कर्मचार्‍यांवर होणाऱ्या खर्चात कपात झाली आहे. भारतीय कंपन्यांसह जगातील सर्व मोठ्या कंपन्या पूर्वीच्या तुलनेत ऑपरेशनल आघाडीवर कमी खर्च करीत आहेत.  कर्मचार्‍यांना अन्न, मनोरंजन आणि सोई पुरवण्यासाठी बरेच पैसे खर्च केले जातात. पण, आता घरातून काम असल्यामुळे हे भत्ते आता कर्मचार्‍यांना दिले जात नाहीत. 


संबंधित बातम्या :