मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील गट 'अ', 'ब' व 'क' मधील विविध १४ संवर्गातील 565 रिक्त पदे भरण्याकरिता राबविण्यात आलेल्या सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत आयोजित स्पर्धात्मक परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी प्रशासनातर्फे 21 ऑक्टोबर, 2021 रात्री 23.59 वाजेपर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून व परीक्षा शुल्क (Fee) भरण्याची मुदत 22 ऑक्टोबर रात्री 23.59  वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती म्हाडाचे सचिव  राजकुमार सागर यांनी दिली. 


म्हाडा प्रशासनातर्फे सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी 17 सप्टेंबर 2021 रोजी  सकाळी 11 वाजेपासून  विहित  अर्हता धारण केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.       


सदरील पदभरती प्रक्रिया विविध संवर्गातील एकूण 565 रिक्त पदांसाठी राबविण्यात येत असून त्यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13 पदे, उप अभियंता (स्थापत्य) 13 पदे, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी 2  पदे, सहायक अभियंता (स्थापत्य) 30 पदे, सहाय्यक विधी सल्लागार 2 पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 119 पदे, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक 6 पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 44 पदे, सहायक 18 पदे, वरिष्ठ लिपिक 73 पदे, कनिष्ठ लिपिक टंकलेखक 207 पदे, लघुटंकलेखक 20 पदे, भूमापक 11 पदे, अनुरेखकाच्या 7 पदांचा समावेश आहे.


वरील रिक्त पदांचा सविस्तर तपशील, शैक्षणिक व अनुभवाची अर्हता, विहित वेतनश्रेणी, सामाजिक/समांतर/दिव्यांग आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, नियुक्तीच्या सर्वसाधारण अटी, शर्ती व प्रक्रिया, ऑनलाइन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क सादर करण्याबाबतच्या सूचना इत्यादी बाबत सविस्तर तपशील केवळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  


पात्र उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करण्याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर असलेल्याच माहितीचे व सविस्तर जाहिरातीचे अवलोकन करावे, असे आवाहन राजकुमार सागर यांनी केले आहे.


म्हाडा प्रशासनातर्फे तर्फे सर्व संबंधित अर्जदारांना आवाहन करण्यात येत आहे कि म्हाडा प्रशासनाने भरती प्रक्रियेसाठी कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व एजंट म्हणून नेमलेले नाही. भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही अनधिकृत व्यक्तींशी कोणतेही आर्थिक अथवा इतर कोणतेही व्यवहार करू नये तसेच त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारे अर्जदारांची फसवणूक झाल्यास म्हाडा प्रशासन जबाबदार राहणार नाही.