JNU Bans Protest :  जगभरात विख्यात असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) हे शैक्षणिक प्रगती आणि विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कासाठी ओळखले जाते. आता मात्र, या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे चळवळीचे बाळकडू बंद होण्याची चिन्हे आहेत. विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठात आंदोलन केल्यास मोठा आर्थिक दंड ठोठावण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांना 20 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो, असे विद्यापीठाने म्हटले आहे. 


नवीन नियम काय?


विद्यापीठ प्रशासनाच्या या आदेशानंतर आता विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जेएनयूच्या कोणत्याही शैक्षणिक किंवा प्रशासकीय इमारतीच्या 100 मीटर परिसरात विद्यार्थ्यांनी धरणे, उपोषण, घोषणाबाजी किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा निषेध केल्यास त्यांना 20 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा कॅम्पसमधून बाहेर काढले जाऊ शकते, असे आदेशात नमूद केले आहे.


परवानगीशिवाय पार्टी केल्यास दंड आकारला जाईल


मुख्य प्रॉक्टर कार्यालयाने या नियमावलीला नुकतीच मान्यता दिली आहे. त्यास विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने 24 नोव्हेंबर रोजी मान्यता दिली. एवढेच नाही तर आता जेएनयू प्रशासनाच्या परवानगीशिवाय पार्टी आयोजित केल्यास दंडही आकारला जाणार आहे.


पार्टी केल्यास 6 हजारांचा दंड


नव्या नियमांनुसार, पूर्वपरवानगीशिवाय कॅम्पसमध्ये फ्रेशर्स पार्टी, फेअरवेल पार्टी किंवा डीजे पार्टी यासारखे कार्यक्रम आयोजित केल्यास दंड ठोठावण्यात येणार असल्याचे म्हटले गेले आहे. आता अशा पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांना 6 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.



विद्यार्थी संघटनांकडून नाराजी व्यक्त


नव्या नियमावलीनुसार, विद्यापीठातील कोणत्याही प्रशासकीय सदस्याच्या घराभोवती कोणत्याही प्रकारचा निषेध करण्यासही बंदी आहे. ही कॅम्पसमधील लोकशाही संस्कृती दाबण्याचा प्रयत्न असल्याचे जेएनयू विद्यार्थी संघटनेने म्हटले आहे. 


प्रॉक्टोरिअल चौकशी वेळी विद्यार्थ्यांना उलटतपासणीस मनाई


एक्झिक्युटिव्ह कौन्सिलने मंजूर केलेल्या नियमावलीनुसार वारंवार शिक्षा झालेल्या विद्यार्थ्यांना आता बाहेर काढता येणार आहे. याशिवाय प्रॉक्टोरिअल चौकशी दरम्यान विद्यार्थ्यांना उलटतपासणी करण्यास परवानगी दिली जाणार नाही आणि वाद झाल्यास कुलगुरूंचा निर्णय अंतिम मानला जाईल.


अभ्यास आणि संघर्षासाठी ओळखले जाते विद्यापीठ


जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक चांगले प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते या विद्यापीठातून बाहेर पडले आहेत. देशातील गरिबातील गरीब विद्यार्थी देखील या कॅम्पसमधून शिक्षण घेऊन बाहेर पडला आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमाशिवाय, विद्यापीठ कॅम्पसमध्ये विद्यार्थी चळवळही जोरात असते. डाव्या-उजव्या-मध्यममार्गी, आंबेडकरवादी संघटना कॅम्पसमध्ये सक्रिय आहेत. विद्यापीठाच्या विद्यार्थी संघावर आतापर्यंत डाव्या विचारांच्या एसएफआय, आइसा या संघटनांचा वरचष्मा राहिला आहे. भाजप-संघाशी संबंधित असलेल्या अभाविपकडून या वर्चस्वाला धक्का देण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला. कॅम्पसमधील लोकशाही वातावरणाचे अनेकदा कौतुक होते. विद्यार्थी संघाच्या निवडणुका आणि त्यात असणारे वाद-विवाद ऐकण्यासाठी मोठी गर्दी होते. 


काही वर्षांपूर्वी कॅम्पसमध्ये झालेल्या कथित देशविरोधी घोषणानंतर जेएनयूतील विद्यार्थी चळवळींना भाजप आणि इतर उजव्या संघटनांकडून लक्ष्य करण्यात आले होते.