Hemant Soren MLA Meeting : झारखंडमध्ये एक नवं राजकीय संकट आलं आहे. निवडणूक आयोगाने ( Election Commission of India) झारखंडचे (Jharkhand ) मुख्यमंत्री हेमंत सोरेन (CM Hemant Soren) यांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. त्यामुळं सोरेन यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची धोक्यात आली आहे. दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सोरेन यांनी आज पुन्हा युपीएच्या (UPA) आमदारांची बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता सोरेन यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे.


झारखंडमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची खुर्ची संकटात आली आहे. त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. झारखंडमध्ये राजकीय संकट असताना, बैठकांचे सत्र सुरुचं आहे. सलग दुसऱ्या दिवशी यूपीएच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. काल देखील सोरेन यांनी आमदारांशी चर्चा केली होती. आज पुन्हा राजकीय घडामोडींवर चर्चा होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी घेतलेल्या बैठकीला काँग्रेसचे तीन आमदार आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे (Jharkhand Mukti Morcha) तीन आमदार उपस्थित राहू शकले नाहीत. सध्या मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सर्व आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचं सांगण्यात येत आहे.


नेमंक प्रकरण काय आहे?
 
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्वत:ला खाण लीज वाटप केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजपने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. भाजपने हेमंत सोरेन यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी लोकप्रतिनिधी आणि लाभ कार्यालय कायदा, 1951 च्या कलम 9A चा हवाला देऊन केली होती. कारण हेमंत सोरेन यांच्याकडे राज्य मंत्रिमंडळातील खाण-वनमंत्रीपद आहे. 


माहिती अधिकार कार्यकर्ते शिवशंकर शर्मा यांनी खाण घोटाळ्याची सीबीआय (CBI) आणि ईडीकडे (ED) चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या दोन जनहित याचिका दाखल केल्या होत्या. हेमंत सोरेन यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन स्टोन क्युरी माईन्स स्वतःच्या नावावर घेतल्याचा आरोप केला आहे. शेल कंपनीत गुंतवणूक करुन मालमत्ता मिळवल्याचाही आरोप त्यांच्यावर केला जात आहे. झारखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांनी देखील सोरेन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. सोरेन यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप यावळी मरांडी यांनी केला आहे.  


महत्त्वाच्या बातम्या: