रांचीः कोरोना संकटकाळात अनेक राज्यांची सरकार वेगवेगळे नियम लावून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेत आहेत. काही राज्यांमध्ये तर खूपच जास्त नियम कडक करण्यात आले आहेत. यातच आता झारखंड सरकारनं घेतलेल्या एका निर्णयाची चर्चा सुरु आहे. झारखंडमध्ये आता मास्क घातला नाही तर 1 लाख रुपये दंड आणि 2 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होणार असल्याची शक्यता आहे.


झारखंड कॅबिनेटमध्ये साथ रोग अध्यादेश 2020 अंशत: मंजूर करण्यात आला आहे. या अध्यादेशानंतर हा नियम लागू केला आहे. झारखंडमध्ये देखील आता कोरोनाबाधितांचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन सरकारने हा निर्णय घेतला आहे.

झारखंडचे आरोग्यमंत्री म्हणतात...

या निर्णयावर झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांनी म्हटलं आहे की, अजून अध्यादेश पूर्णत: पारित झालेला नाही. दंडाविषयी सांगायचं झालं तर यात कुणी दोषी आढळल्यानंतर हा दंड आकारण्यात येणार आहे. असं नाही की कुणाला स्पॉट चेकिंगमध्ये पकडल्यानंतर एक लाख रुपये दंड द्यावा लागेल. आमचं सरकार पूर्ण जागरुकतेने कोरोनाविरोधातील लढाई लढत आहे.

झारखंडमध्ये वाढल्या कोरोना केसेस
झारखंडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढून 6485 झाली आहे. यातील 3397 अॅक्टिव्ह केसेस आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात 3024 रुग्ण बरे देखील झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 64 लोकांचा कोरोना व्हायरसमुळं मृत्यू झाला आहे.

कोरोना गाईडलाईन्सचं पालन आवश्यक

कोरोना गाईडलाईन्सचं उल्लंघन करणं लोकांना आता महागात पडणार आहे, असं झारखंडच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, दोषी सिद्ध झाल्यावर त्या लोकांना दोन वर्ष जेल देखील होऊ शकते.

कोरोना रुग्णांची संख्या देशात 12 लाखांच्या वर 

भारतात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या देशात 12 लाखांच्या वर गेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात सध्या 12,38,635 कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यातील 29,861 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनामुळं महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. या सात राज्यातच 25,646 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.