नवी दिल्ली :  मुलींच्या अब्रूपेक्षा मत अधिक महत्त्वाचं आहे, असं वादग्रस्त वक्तव्य जनता दल युनायटेड अर्थात जेडीयूचे नेते खासदार शरद यादव यांनी केलं. शरद यादव यांनी मंगळवारी पाटण्यात हे वक्तव्य केलं.

"मतपत्रिका कशी काम करते हे लोकांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे.


मताची इज्जत तुमच्या मुलीच्या इज्जतीपेक्षा जास्त असते.


जर मुलीची इज्जत गेली तर केवळ गाव आणि परिसराची इज्जत जाईल.


मात्र जर एकदा मत गेलं तर देश आणि प्रदेशाची इज्जत जाईल",


असं शरद यादव म्हणाले.


शरद यादव यांनी मतांची तुलना महिलांशी केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.  त्यामुळे शरद यादव टीकेचे धनी बनले आहेत.

दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोग शरद यादव यांना नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहे.

दुसरीकडे जदयूकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

जदयू नेते के सी त्यागी यांच्या मते,


"मुलगी आणि मत हे दोन्हीही समान आहे, असं शरद यादव यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे"


शरद यादव यांनी पहिल्यांदाच असं वादग्रस्त वक्तव्य केलंय असं नाही.

https://twitter.com/ANI_news/status/824081108325146624

महिलांच्या वर्णावर टीपण्णी

यापूर्वी शरद यादव यांनी महिलांच्या वर्णावरुन टीपण्णी केली होती. दक्षिण भारतातील महिला सावळ्या असल्या तरी त्यांचं बांधा उत्तम असतो. त्यांची त्वचा तजेलदार असते, त्या डान्सही उत्तम करतात. मात्र भारतातील लोक गोऱ्या शरीराला भुलतात, असं शरद यादव म्हणाले होते.

महिला आरक्षण विधेयक

शरद यादव यांनी संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला होता. जर महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाली, तर मी विष खाईन असं शरद यादव म्हणाले होते.