चेन्नई: जयललितांच्या निधनानंतर ओ पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयललितांनी विश्वास दाखवलेले पन्नीरसेल्वम आहे तरी कोण?

विश्वासू साथीदार

ओ पन्नीरसेल्वम.....जयललितांचे उत्तराधिकारी....विश्वासू साथीदार आणि अण्णा द्रमुकचा प्रभावी चेहरा अशीच त्यांची ओळख करुन द्यावी लागेल. त्यामुळे जयललिता यांनी दोनवेळा मुख्यमंत्रिपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर दिली. आणि त्यांनीही तेवढ्याच विश्वासानं ही धुरा सांभाळली.

चहावाला मुख्यमंत्रीपदी

पन्नीरसेल्वम यांचा जन्म 1951 थेनी जिल्ह्यातील पेरियाकुलम् गावात झाला. विशष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे पनीरसेल्वम सुद्धा चहाचं दुकान चालवयाचे.

तत्कालीन अभिनेते तथा अन्ना द्रमुकचे संस्थापक एमजी रामचंद्रन यांच्या कामामुळे तामिळनाडूतील अनेक तरुण प्रभावीत झाले. त्यात पन्नीरसेल्वम होते. त्यांच्या प्रभावामुळेच पनीरसेल्वम यांनी राजकारणात उडी घेतली. आणि 1996 ते पहिल्यांदा पेरियाकुम नगरपालिकेच्या निवडणुकीला उभे राहिले आणि अण्णा द्रमुककडून थेट नगराध्यक्ष झाले.

याच काळात विधानसभांच्या निवडणुकीत अण्णा द्रमुकचा दारुण पराभव झाला. अनेक नेत्यांनी अण्णा द्रमुकची साथ सोडली. मात्र पनीरसेल्वम एकनिष्ठ राहिले. आणि त्यांचा पक्षातही प्रभाव वाढत गेला.

पहिल्यांदा मुख्यमंत्री

जयललितांचा विश्वास संपादन केल्यामुळे त्यांना पहिल्यांदा 2001 साली मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली.

उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं जयललितांना कुठलंही पद स्वीकारण्यास मज्जाव केला. त्यावेळी पहिल्यांदा जयललितांनी पनीरसेल्वम यांनी संधी दिली.

२१ सप्टेंबर 2001 ते 1 मार्च 2002 पर्यंत म्हणजे जवळपास सहा महिने त्यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली.

एकदाही जयललितांच्या खुर्चीवर बसले नाहीत

याकाळात त्यांनी जयललितांचा विश्वास अजितबात ढळू दिला नाही. उलट त्यांच्या मर्जीबाहेर एकही निर्णय घेतला नाही.

यामुळे त्यांची तुलना राम आणि भरताच्या बंधूप्रेमाप्रमाणे होऊ लागले.  कारण मुख्यमंत्रिपदावर असतानाही एकदाही ते जयललितांच्या खुर्चीवर बसले नाहीत.

पनीरसेल्वम् यांच्या याच कृतीमुळे जयललिता प्रभावित झाल्या. एवढंच नाही तर सुप्रीम कोर्टानं बेहिशेबी मालमत्तेप्रकऱणी 2002 साली जयललितांना दोषमुक्त केलं. त्यावेळी तातडीनं त्यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची अम्मांसाठी रिकामी केली.

मंत्रिमंडळात विशेष जबादारी

पनीरसेलव्हम यांच्या स्वामीनिष्ठेमुळे जयललिता त्यांना मंत्रिमंडळात विशेष जबादारी दिली. मधल्या काळात अण्णा द्रमुकची सत्ता गेली. मात्र जयललिता आणि अण्णा द्रमुकवर पनीरसेल्वम यांची निष्ठा कायम राहिली.

मे 2011 साली तामिळनाडूत पुन्हा जयललितांची जादू चालली. अण्णा द्रमुकला सत्ता मिळाली. त्यावेळी पनीरसेल्वम यांना या निष्ठेचं बक्षीस मिळालं. आणि जयललितांच्या मंत्रिमंडळात त्यांना क्रमांक दोनचं स्थान मिळालं.

दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी

सप्टेंबर 2014 साली जेव्हा बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी बंगळुरु कोर्टानं अम्मांना चार वर्षाची शिक्षा सुनावली. त्यावेळी अम्मांनी उत्तराधिकारी म्हणून पनीरसेल्वम यांचीच निवड केली. आणि ते दुसऱ्यांदा तामिळनाडूच्या गादीवर विराजमान झाले.

29 सप्टेंबर 2014 ला पनीरसेल्वम यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जवळपास नऊ महिने म्हणजे 22 मे 2015 पर्यंत त्यांनी पदभार स्वीकारला.

याकाळातही ते कधीही जयललितांच्या खुर्चीवर बसले नाही. एवढंच काय तर ते कायम अम्मांचा फोटो आपल्या खिशात ठेवतात. अम्मांप्रती त्यांच्या निष्ठेच्या अनेक रंजक कथा तामिळनाडूत सांगितल्या जातात.

ना अहंकार, ना उद्धटपणा

मुख्यमंत्री असताना त्यांनी कधीही अहंकार बाळगला नाही. कायम अम्मांची मर्जी मिळवत गेले. एवढंच नाही तर अण्णा द्रमुकच्या कुठल्याही नेत्यांसोबत त्यांनी उद्धट वर्तन केलं नाही. असं असलं तरी पक्षामध्ये पनीरसेल्वम यांच्यापेक्षा जयललितांची शशिकलांना साथ असल्याचं बोललं जातं. पनीरसेल्वम आणि शशिकलांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्याही आधूनमधून येतात. पण आतापर्यंत तरी त्यांच्या जाहीर वाद झाले नाहीत.

महाराष्ट्राप्रमाणं तामिळनाडूत जातीच्या राजकारणाचा प्रभाव आहे. पनीरसेल्वम थेवर समुदायाचं प्रतिनिधीत्व करतात. जो समाज दक्षिण तामिलनाडूत अत्यंत प्रभावी आहे. परिणामी पनीरसेल्वम यांचं राजकीय वजनदेखील तगडं आहे. त्यामुळे जयललितांचा वारसा ते समर्थपणे पेलतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.