नवी दिल्ली:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 72 व्या स्वातंत्र्य दिनी देशाला उद्देशून भाषण केलं. मोदींनी आपल्या भाषणात चार वर्षांच्या कामाचा लेखाजोखा केला. भारत वेगाने प्रगती करत असून, विकासाचा वेग हा 2013 च्या तुलनेत प्रचंड वाढल्याचा दावा त्यांनी केला.

आपल्या भाषणात त्यांनी तिहेरी तलाक, करदात्यांची संख्या, चंद्रपूरच्या तरुणांचं कौतुक, बलात्काऱ्यांना तातडीने फाशीची तरतूद, महिलांचं योगदान अशा विविध विषयावर भाष्य केलं.

मोदींचं यंदाचं भाषण हे 1 ता 22 मिनिटे म्हणजे च 82 मिनिटे होतं. सकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी सुरु केलेलं भाषण 8 वाजून 55 मिनिटांनी संपलं. तरीही मोदींनी 96 मिनिटांचा स्वत:चा विक्रम कायम ठेवला.

2016 मध्ये सर्वात मोठं भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावरुन आतापर्यंतचं सर्वात मोठं भाषण केलं होतं. 2016 मध्ये मोदींनी 96 मिनिटांचं भाषण केलं होतं, जे आतापर्यंत एखाद्या पंतप्रधानाचं सर्वात मोठं भाषण होतं.

2017 मधील भाषण 55 मिनिटांचं तरीही सर्वात लहान

लाल किल्ल्यावरुन मोदींनी आतापर्यंत पाच भाषणं केली. 2017 मध्ये मोदींनी 55 मिनिटांचं भाषण केलं होतं. 2017 मधील 55 मिनिटांच्या भाषणात मोदींनी विविध विषयांवर भाष्य केलं.

पहिले पंतप्रधान नेहरुंचं 72 मिनिटांचं भाषण

यापूर्वी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी पहिल्या स्वातंत्र्य दिनाला 15 ऑगस्ट 1947 रोजी 72 मिनिटे भाषण केलं होतं.

पंतप्रधान मोदींनी जुलै 2017 मध्ये देशवासियांकडून मागवलेल्या सुचनांनुसार संक्षिप्त भाषण करणार असल्याचं सांगितलं होतं. भाषण जरा जास्त मोठं होत असल्याचं काही पत्रांमध्ये म्हटल्याचं मोदींनी 'मन की बात'मध्ये सांगितलं होतं. त्यामुळे यावेळी (2017 मध्ये) सर्वात छोटं भाषण देण्याचं वचन मोदींनी दिलं होतं. त्यानुसार मोदींनी वचन पूर्ण करत 2014 मध्ये ते पंतप्रधान झाल्यानंतरचं सर्वात छोटं भाषण केलं.

2014 ते 2018 मोदींच्या भाषणाची वेळ

मोदींनी 2014 मध्ये 65 मिनिटे, 2015 मध्ये 86 मिनिटे, 2016 मध्ये 96 मिनिटे आणि 2017 मध्ये सर्वात कमी वेळेत म्हणजे 55 मिनिटांमध्ये भाषण संपवलं. तर यंदा म्हणजे 2018 मध्ये त्यांनी 82 मिनिटे भाषण केलं.

मनमोहन सिंह 50 मिनिटे, वाजपेयी 30-35 मिनिटे

यापूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात 50 मिनिटांच्या आतच भाषण पूर्ण केलं. तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 30 ते 35 मिनिटे देशाला संबोधलं होतं.

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या दहा रंजक गोष्टी!