72 वा स्वातंत्र्यदिन नवी दिल्ली : 72 व्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा देशभरात साजरा होत आहे. राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित केलं. 2019 लोकसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान मोदींचं हे लाल किल्ल्यावरील अखेर भाषण होतं.


मुंबईत राजभवनामध्ये राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात झेंडावंदन करण्यात येणार आहे.

मुंबईत मुलुंडमधील संभाजी मैदानावर मध्यरात्री ठीक 12 वाजता ध्वजारोहण करण्यात आलं. गेल्या 17 वर्षांपासून म्हणजेच कारगील युद्धापासून या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ध्वजारोहणानंतर शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते.

शिवसेना नेते शिशिर शिंदे यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित होतो. यावर्षी अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

मुंबईत घाटकोपरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरही ध्वजारोहण करण्यात आलं. मध्यरात्री 12 वाजता हा सोहळा पार पडला. यावेळी दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

भाजप आमदार राम कदम यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. शहीद जवानांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. घाटकोपरमधल्या रहिवाश्यांनी यावेळी हजेरी मोठ्या संख्येने लावली होती.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अख्खा महाराष्ट्र तिरंग्याच्या आकर्षक रोषणाईत उजळून निघाला. सरकारी कार्यालये आणि प्रसिद्ध वारसास्थळांवर तिरंगी दिव्यांची आरास केल्यामुळे स्वातंत्र्यदिनाचा उत्साह द्विगुणित झालेला दिसला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,  मुंबई महापालिकेची इमारत, मंत्रालयाची इमारत आणि विधानभवन इमारतीलाही नयनरम्य रोषणाईने सजवण्यात आलं.

दिल्लीतल्या राजपथावरही स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्या दिव्यांचा लखलखाट दिसला. संपूर्ण राजपथ परिसर आकर्षक रोषणाईत न्हाऊन निघाला होता.