Japan PM In India : रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेले युद्ध आणि चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान फुमियो किशिदा (Japan PM Fumio Kishida) हे दोन दिवसांच्या भारत भेटीवर दाखल होणार आहेत. जपानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर किशिदा यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. या दौऱ्यात किशिदा हे आगामी पाच वर्षात 42 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे.


जपानी वृत्तसंस्था निक्केईने दिलेल्या वृत्तानुसार, किशिदा भारताला 2.5 अब्ज डॉलरचे कर्ज देण्याच्या निर्णयावर सहमतदेखील होऊ शकतात. जपानचे पंतप्रधान भारतात जपानी कंपनीच्या गुंतवणुकीबाबत घोषणा करू शकतात. शिंजो आबे हे जपानचे पंतप्रधान असताना 2014 मध्ये त्यांनी भारतातील गुंतवणुकीबाबत निर्णय घेतला होता. शिंजो आबे यांनी 3.5 ट्रिलियन येन गुंतवणुकीची घोषणा केली होती. आता किशिदा हे 5 ट्रिलियन गुंतवणुकीची घोषणा करू शकतात.


जपान सध्या भारताला शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मदत करत आहे. याशिवाय जपानच्या मदतीने भारतात बुलेट ट्रेन चालवण्याचे काम सुरू आहे. जपानचे पंतप्रधान दोन दिवस भारतात असतील. भारत आणि जपान यांच्यातील ही 14 वी शिखर परिषद आहे जी साडेतीन वर्षांच्या कालावधीनंतर होणार आहे. किशिदा यांनी 4 ऑक्टोबर 2021 रोजी जपानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. या भेटीदरम्यान किशिदा आणि पंतप्रधान मोदी दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध आणि द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा करतील.


 




सायंकाळी पंतप्रधान मोदी यांची घेणार भेट 


संध्याकाळी पाच वाजता दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये दोन्ही पंतप्रधानांमध्ये बैठक होणार आहे. चर्चेनंतर दोन्ही नेते माध्यमांसमोर येणार आहेत. या भेटी दरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार देखील होऊ शकतात. भारत आणि जपानच्या पंतप्रधानांमध्ये तब्बल साडेतीन वर्षांनंतर शिखर बैठक होणार आहे. दरम्यान,  2022 हे वर्ष भारत आणि जपानमधील राजनैतिक संबंधांच्या 70 व्या वर्धापन दिनाचे वर्ष आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :